
संपूर्ण जगात पेणच्या रेखीव , आकर्षक आणि सुंदर गणेशमूर्तींची ख्याती आहे. त्यामुळेच देश विदेशात येथील गणेशमूर्तींना मोठी मागणी असते.

यावर्षीही गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेण हमरापूरच्या विघ्नहर्ता श्रीगणेशाचा सातासमुद्रापारचा प्रवास सुरू झाला आहे. येथील गणेशमूर्ती कारखान्यात मोठी लगबग सध्या सुरू आहे.

घरगुती आणि सार्वजनिक मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. आकर्षक रेखीव गणेशमूर्तीसाठी प्रसिध्द असलेल्या पेण मधून यंदा 26 हजार गणेशमूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या आहेत.

थायलँड, दुबई, अमेरीका, ऑस्ट्रेलिया, मॉरेशियस, इंडोनेशिया, कॅनडा आणि इंग्लड येथे या मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत. परदेशातील अनिवासी भारतीयांनी ऑनलाईन नोंदणी केलेनूसार या गणेशमूर्ती रवाना करण्यात आल्या आहेत.

पेण तालुक्यातील काही गणेशमूर्ती कार्यशाळांतून शाडू मातीच्या व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 28 हजार गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत.

यंदा साधारणपणे 10 इंचापासून 6 फूट उंचीच्या गणेश मूर्ती जेएनपीटी बंदरातून परदेशात पाठविण्यात आल्या आहेत. तर सार्वजनिक मंडळांसाठी मागणीनुसार 10 फुटापासून 15 फुटांपर्यंतच्या मूर्ती देखील तयार करण्यात आल्या आहेत.