
राज्यात सर्वत्र गणपती बाप्पााच्या आगमनाने उत्साह संचारलेला आहे. आपण सर्वांचे लाडके विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता श्री गणेशांच्या अद्भुत कथांचा अनुभव घेतो. हिंदू धर्मात गणेशजींना प्रथम पूजनीय मानले जाते आणि त्यांच्याविषयी अनेक धार्मिक मान्यता प्रचलित आहेत.

सामान्यतः गणपती बाप्पांना ब्रह्मचारी मानले जाते, परंतु अनेक धर्मग्रंथांमध्ये त्यांच्या दोन पत्नींचा उल्लेख आढळतो. रिद्धी आणि सिद्धी अशी त्यांच्या पत्नींची नावे आहेत. या दोन देवतांची गणपती बाप्पांसोबत पूजा करणे खूप शुभ मानले जाते.

एका मान्यतेनुसार, रिद्धी आणि सिद्धी या भगवान विश्वकर्मा यांच्या कन्या होत्या. विश्वकर्मा हे देवांचे वास्तुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. या मान्यतेनुसार, विश्वकर्मा हे गणेशाचे सासरे आहेत.

तर दुसऱ्या एका मान्यतेनुसार, रिद्धी आणि सिद्धी या ब्रह्मदेवाच्या मानस कन्या होत्या. याचा अर्थ असा की त्यांची निर्मिती ब्रह्मदेवाच्या संकल्पनेतून झाली होती. या मान्यतेनुसार ब्रह्मदेव हे गणेशाचे सासरे आहेत.

रिद्धी आणि सिद्धी यांच्यासोबतच्या विवाहानंतर गणेशांना दोन पुत्र झाले. रिद्धीचा पुत्र शुभ आणि सिद्धीचा पुत्र लाभ. अनेक कुटुंबांमध्ये गणपती बाप्पांच्या प्रतिमेसोबत रिद्धी-सिद्धी आणि त्यांचे पुत्र शुभ-लाभ यांच्या मूर्ती किंवा चित्रे लावण्याची प्रथा आहे. या संपूर्ण कुटुंबाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि यश येते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)