
Gold And Silver Price Today: जळगावच्या सराफा बाजारात सोन्यापेक्षा चांदीने दिमाख दाखवला आहे. चांदीच्या किंमतींनी सर्व रेकॉर्ड मोडीत काढत मोठी भरारी घेतली आहे. चांदीने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे ग्राहकची चकीत झाले आहेत. सोन्याचा आजचा भाव काय आहे?

जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 6 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. ही आतापर्यंतची चांदीची उच्चांकी कामगिरी मानल्या जात आहे. औद्योगिकसह सराफा बाजारात चांदीच्या वाढत्या मागणीमुळे किंमती गगनाला भिडल्या आहेत.

जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने दोन लाख 6 हजारांचा आकडा पार केला आहे. गेल्या दोन दिवसात चांदीच्या दरात तब्बल 9 हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. अनेक गुंतवणूकदारांनी आता गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफकडे मोर्चा वळवला आहे.

चांदीच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे काहींना लॉटरी लागली आहे. काही ग्राहक जुनी चांदीची भांडी आणि इतर दागिने मोडीत काढण्यासाठी सराफा बाजाराकडे वळले आहेत. त्यांच्याकडील ऐतिहासीक ठेवा असलेली ही भांडी अनेकांनी तशीच ठेऊन दिली होती. त्याचा फारसा उपयोग होत नसल्याने काहींनी ही भांडी मोडीत काढली आहे. वाढत्या किंमतींचा त्यांना मोठा फायदा झाला आहे.

दरम्यान जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दारात आज 200 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी 1 लाख 36 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याने उच्चांकी झेप घेतल्याने वधू आणि वराकडील मंडळींनी बेतानंच सोनं खरेदी केल्याचे दिसून येते.

नवीन वर्षातही दोन्ही धातू मोठी भरारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपात आणि सोने आणि चांदीला वाढती मागणी या सर्वांचा परिणाम या दोन्ही धातुंच्या किंमतीवर होताना दिसत आहे