
गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. जागतिक व्यापार आणि अस्थितरता लक्षात घेता लोक या दोन मौल्यवाना धातूंमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळेच या दोन्ही धातूंच्या भावात मोठी वाढ होत आहे.

महाराष्ट्रात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावातील सराफ बाजारात चांदीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे.गेल्या 24 तासात चांदीच्या दरात तब्बल 12 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा भावदेखील असाच आश्चर्यकारकरित्या वाढला आहे.

या भाववाढीनंतर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 28 हजार 660 रुपये प्रति किलो या ऐतिहासिक विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरात देखील 700 रूपयांची वाढ झाली आहे. जीएसटीसह सोन्याचे दर 1 लाख 40 हजार 801 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे.

सोन्या आणि चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी ही वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत चांदीच्या दरात तब्बल 31 हजार रुपयांची वाढ झालेली आहे. तर सोन्याच्या दरात 5 हजार 200 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस सोन्याला चकाकी मिळत असल्याने सामान्यांची दागिने खरेदी करण्याची इच्छा लांबणीवर पडत आहे. अशीच स्थिती राहिली तर सोन्याचा भआव थेट दीड लाखांच्याही पुढे जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.