
क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टँकोविक यांनी यावर्षी जुलै महिन्यात घटस्फोट जाहीर केला. या दोघांना अगस्त्य हा मुलगा आहे. घटस्फोटानंतर नताशा मुलासोबत तिच्या मायदेशी सर्बियाला गेली होती. नुकतीच ती अगस्त्यसोबत भारतात परतली. त्यानंतर हार्दिकने मुलासोबत काही वेळ घालवला.

घटस्फोटाच्या बऱ्याच काळानंतर हार्दिक त्याच्या मुलाला भेटला. या भेटीचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे. सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हार्दिक त्याचा मुलगा अगस्त्य आणि पुतण्या कबीर या दोघांना घेऊन एअरपोर्टवरून बाहेर येताना दिसत आहे.

सर्बियावरून परतल्यानंतर अगस्त्य हा हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याच्या कुटुंबीयांसोबत बडोदामध्ये राहत आहे. हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर अगस्त्य आणि कबीरसोबतचा फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये 'आनंद' असं लिहिलंय.

हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्यानेही त्याच्या अकाऊंटवर मुलांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो गणेशोत्सवादरम्यानचे असून यामध्ये अगस्त्यसुद्धा दिसून येत आहे.

हार्दिक आणि नताशाने जुलै महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हार्दिक-नताशाने 2020 मध्ये गुपचूप लग्न उरकलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दोघांनी पुन्हा हिंदू आणि ख्रिश्चन विवाहपद्धतीनुसार लग्न केलं.