
पिंपरी चिंचवडच्या चिखलीमधील घरकुल मधल्या इमारतींमध्येही पाणी शिरले आहे. सखल भागात गुडघ्या हून अधिक पाणी साठ झालेले आहे. अनेक वाहन पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास इमारतीमधल्या घरांमध्येही पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पुण्यातील मुठा नदी दुथडी भरुन वाहत आहे. धरणातून 35574 क्यूसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

पुणे शहरातच नव्हेच तर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. धरण परिसरात 100 मिमी व घाटमाथ्यावर 200 मिमी पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.

पुणे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे. नागरिकांना या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, डेक्कनमधील शितळा देवी मंदिर, संगम पूल पुलासमोरील वस्ती, होळकर पूल, कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्यात आला आहे.

पुण्यात झालेल्या अतीमुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. लोणावळा परिसरामध्ये मागील 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे.