
पावसाळी वातावरणात गरमा-गरम भजी, वडापाव असं काहीतरी खाण्याची अनेकांची इच्छा होते. पण असं कोणी खाऊ घालणारा भेटला तर स्वत:ला नशिबवानच समजायचं. अशीच काहीतरी भावना सध्या अभिनेत्री हेमांगी कवीची आहे.

'कुठलाही उपास-तपास, नवस न करता मिळालेला आणि अशा मस्त पावसाळी वातावरणात जवला-बेसन भजी, चिकन बिर्याणी खाऊ घालणारा, स्वयंपाक झाल्यावर ओटा बिटा स्वच्छ पुसून, भांडी बिंडी घासून ठेवणारा नवरा. अजून काय पाहिजे?,' अशी पोस्ट लिहित तिने काही फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर अनिकेत नावाच्या मुलाला त्याची बायको विविध पदार्थ बनवून खायला देते. त्यामुळे तो खूपच नशिबवान असल्याच्या प्रतिक्रिया सतत नेटकऱ्यांकडून येत असतात. परंतु तो अनिकेत काय एकटाच नशीबवान नाही, असं हेमांगी अभिमानानं म्हणतेय.

हेमांगीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'नशीबवान आहेस, अनिकेतला उगाच डोक्यावर घेतलंय. खरी मजा तर नवऱ्याने बायकोला काहीतरी छान बनवून खाऊ घालण्यात आहे. असा नवरा खूपच कमी जणींकडे असावा', अशी कमेंट एकाने केली. तर 'मलाही दाजींसारखाच नवरा पाहिजे', असं दुसरीने म्हटलंय.

हेमांगीच्या पतीचं नाव संदीप धुमाळ असून तो एक सिनेमॅटोग्राफर आहे. या दोघांचं लव्ह-मॅरेज झालं असून एका चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिल्यांदा ओळख झाली होती. संदीप अत्यंत मितभाषी, शांत आणि संयमी असल्याचं हेमांगीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.