
अभिनेता हिमांशू मल्होत्रा आणि मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या नात्यात काही तक्रारी असल्याच्या चर्चा सतत होत आहेत. अमृताने पती हिमांशूला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. त्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.

आता सहा वर्षांनंतर अमृताचा पती आणि अभिनेता हिमांशूने यामागचं सत्य सांगितलं आहे. अमृतासोबत त्याचं नातं कसं आहे, खरंच त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू आहे का, या प्रश्नांची उत्तरं त्याने मोकळेपणे दिली.

'फिल्मीबीट प्राइम'ला दिलेल्या मुलाखतीत हिमांशूने सांगितलं की जवळपास 6 वर्षांपूर्वी अमृताने त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. इतकंच नव्हे तर तिने त्याला अनफॉलोसुद्धा केलं होतं.

हिमांशू म्हणाला, "तिने मला फक्त ब्लॉक केलं नव्हतं, तर अनफॉलोसुद्धा केलं होतं. मी शूटिंगमध्ये व्यस्त होतो आणि तिला माझ्याशी बोलायचं होतं. त्यादरम्यान आमच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात तिने मला ब्लॉक करून अनफॉलो केलं होतं."

"त्यावेळी मी राजस्थानमध्ये शूटिंग करत होतो. माझं सात ते आठ दिवसांचं शूटिंग होतं. 2015 मध्ये आमचं लग्न झालं होतं. त्यानंतरची ही गोष्ट आहे. मला असं वाटतं की रागाच्या भरात किंवा घाईघाईत आपण कधीकधी असं वागतो", असं हिमांशूने स्पष्ट केलं.

नंतर त्या दोघांमधील वाद संपुष्टात आले आणि आज लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही दोघं एकमेकांसोबत आहेत. याआधी 'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अमृता म्हणाली होती, "मी हिमांशूला ब्लॉक करून किती बालिश वागले होते, याची जाणीव मला आता होते. तो संपूर्ण रात्रभर मला कॉल करत होता. परंतु मी त्याचा नंबरसुद्धा ब्लॉक केला होता."

"रागाच्या भरात मी तशी वागले होते. यावरून आमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू असल्याच्या चर्चा होतील, याचा मी किंचितही विचार केला नव्हता", असं अमृता म्हणाली होती.