
देशभरात मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात. होळीच्या निमित्ताने लावण्यात येणारे रंग आनंद पसरवण्याचे काम करतात.

परंतु, जर या रंगांमध्ये भेसळ असेल तर मात्र रंगाचा बेरंग होतो. सध्या बाजारात अनेक रासायनिक रंग आले आहेत. यामुळे शरीराला हानी पोहोचते. रंगपंचमीसाठी आपण ज्या रंगांचा वापर करतो त्या रंगांमध्ये क्रोमियम, सिलिका, शिसे, सल्फेट आणि अल्कलाईन सारखी रसायने देखील टाकली जातात.

यामुळे होळी फक्त नैसर्गिक आणि सेंद्रीय रंगांनी खेळा, असा सल्ला दिला जातो. यंदाची रंगपंचमी भीतीच्या सावटाखाली जायला नको, तसेच सणाचा उत्साह कमी नको व्हायला यासाठी तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक रंग तयार करु शकता.

बीट - बीटापासून तुम्हाला घरच्या घरी गडद लाल रंग बनवता येतो. यासाठी तुम्ही बीट नीट धुवून घ्या. त्याचे लहान तुकडे करा. किसून त्याचा रस काढा. यानंतर ते एका सुती कापडात घेऊन उन्हात वाळवा. ते सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची पावडर बनवा. यामुळे तुम्हाला नैसर्गिक लाल रंग मिळेल.

पालक: पालकापासून हिरवा रंग तयार करता येतो. यासाठी पालकाची पाने चांगली धुवून ती उकळवा. ती उकळल्यानंतर पालक चांगले वाळवा आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून पावडर करुन घ्या.

गाजर: गाजरांपासून रंग बनवले जाता. यासाठी तुम्ही गाजर चांगले किसून घ्या आणि उन्हात ठेवा. यानंतर त्याची बारीक पावडर करुन घ्या.

हळद: हळद नैसर्गिकरित्या पिवळ्या रंगाची असते. त्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. होळीसाठी पिवळा रंग हवा असेल तर तुम्ही हळदीचा हमखास वापर करु शकता.

गुलाबाच्या पाकळ्या: गुलाबाच्या पाकळ्या वापरून तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक रंग बनवू शकता. ते बनवायला खूप सोपे असते. यासाठी ताज्या गुलाबाच्या पाकळ्या नीट धुवून वाळवा. नंतर पाकळ्या बारीक करून त्याची पावडर बनवा. या गुलाबी पावडरचा वापर तुम्ही रंग खेळताना करु शकता.

झेंडूची फुले - झेंडूची फुले पिवळ्या आणि नारिंगी रंगाची असतात. याद्वारेही तुम्हाला रंग बनवता येऊ शकतो. जर तुम्हाला फुलांपासून ओला रंग बनवायचा असेल तर तुम्ही फुलांच्या पाकळ्या गोळा करा. या पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्या फुलांचा ओला रंग तयार होईल.