
सध्या आपल्या प्रत्येकाची जीवनशैली ही धावपळीची बनली आहे. धावपळीच्या जीवनशैलीत आपण अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, ज्याचा थेट परिणाम आपल्या झोपेवर होतो.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी झोपेची गरज वेगवेगळी असते. शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी पुरेशी झोप घेणे अनिवार्य आहे. आज आपण निरोगी आयुष्यासाठी वयानुसार किती तास झोप आवश्यक याबद्दलची माहिती घेणार आहोत.

नवजात बालकांना सर्वात जास्त झोपेची गरज असते. त्यांच्या शारीरिक विकासासाठी दिवसातील १४ ते १७ तास झोप आवश्यक मानली जाते. तर १ ते २ वर्षे वयोगटातील मुलांना ११ ते १४ तास, तर ३ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना १० ते १३ तास झोप मिळणे गरजेचे आहे. या काळात मुलांच्या मेंदूचा विकास वेगाने होत असतो.

शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी (६-१३ वर्षे) ९ ते ११ तास आणि किशोरवयीन मुलांसाठी (१४-१७ वर्षे) ८ ते १० तास झोप पुरेशी असते. अभ्यासाचा ताण आणि शारीरिक हालचालींमुळे ही झोप अत्यंत महत्त्वाची ठरते.

काम करणाऱ्या आणि तरुण पिढीसाठी किमान ७ ते ९ तास झोप घेणे आवश्यक आहे. ७ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते आणि चिडचिड वाढते.

तर वयोवृद्ध व्यक्तींना साधारणपणे ७ ते ८ तास झोपेची गरज असते. वाढत्या वयानुसार झोपेच्या पॅटर्नमध्ये बदल होत असल्याने शांत आणि गाढ झोप मिळणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

जर शरीराला आवश्यक तितकी झोप मिळाली नाही, तर उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि डिप्रेशन यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता.

शांत झोप लागण्यासाठी रात्रीचे जेवण हलके असावे. झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्हीचा वापर टाळून एखादे पुस्तक वाचणे किंवा ध्यान करणे फायदेशीर ठरते. (डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)