एका दिवसात किती आंबे खावेत? आंबा प्रेमींना अजिबात नसेल माहिती
उन्हाळ्यात फळांचा राजा आंबा किती प्रमाणात खावा? एका दिवसात किती आंबे खाणे सुरक्षित आहे आणि आंबा खाण्याची योग्य पद्धत कोणती, याबद्दलची सविस्तर माहिती आणि आरोग्यदायी टिप्स येथे वाचा.

उन्हाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते म्हणजे आंबा खाण्याचे. फळांचा राजा असलेल्या आंबा चवीला तर उत्तम असतोच, पण त्यात जीवनसत्त्व ए, सी आणि अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.

पण असं असलं तरीही आंबा प्रत्येकासाठी फायदेशीर ठरतोच असं नाही. काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी आंबा खाणे घातक ठरू शकते. आंबा अतिप्रमाणात खाल्ल्याने किंवा चुकीच्या वेळी खाल्ल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. तसेच याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील अधिक असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आंबा खाऊ नये.

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आंबा अडथळा ठरू शकतो. आंब्यामध्ये कॅलरीज भरपूर असतात. एका मध्यम आकाराच्या आंब्यातून सुमारे १५० ते २०० कॅलरीज मिळतात, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

आंब्यामध्ये फायबर असते, जे पचनासाठी चांगले मानले जाते. मात्र, अतिप्रमाणात आंबा खाल्ल्याने जुलाब किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. ज्यांना वारंवार पोटाचे विकार होतात, त्यांनी मर्यादित प्रमाणातच आंबा खावा.

काही लोकांना आंब्याच्या चिकामुळे किंवा त्यातील विशिष्ट घटकांमुळे त्वचेवर खाज येणे, पुरळ उठणे किंवा डोळे लाल होणे अशा ऍलर्जी जाणवू शकतात. अशा व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आंब्याच्या अतिसेवनाने शरीरातील युरिक ऍसिडची पातळी वाढू शकते. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास असलेल्या रुग्णांच्या वेदना वाढू शकतात.

आंबा खाण्यापूर्वी किमान १-२ तास पाण्यात भिजवून ठेवावा, ज्यामुळे त्यातील उष्णता कमी होते. रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणे टाळावे, कारण यामुळे पचनात अडथळे येऊ शकतात. आमरस खाताना त्यात साखर टाकणे टाळावे, कारण आंब्यात आधीच पुरेशी नैसर्गिक साखर असते.

तुम्ही दिवसाला एक मध्यम आकाराचा आंबा खाणे पुरेसे आहे. जर तुम्ही आमरस खात असाल, तर एक लहान वाटी आमरस दिवसासाठी पुरेसा ठरतो.