
90 च्या दशकात बॉलिवूड आणि पॉप म्युझिकच्या दुनियेत चमकणारी ही गायिका आणि अभिनेत्री केवळ चित्रपटांपुरती मर्यादित नव्हती. आपल्या वेगळ्या आवाजामुळे, व्यक्तिमत्त्वामुळे आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे तिने संपूर्ण पिढीवर आपली छाप सोडली.

‘एक दो तीन’ या लोकप्रिय म्युझिक शोमधून तिने घराघरात ओळख मिळवली तर ‘दुनिया’, ‘प्यार का राग’, ‘सच का साथ’ यांसारख्या हिट अल्बम्समुळे ती एक पॉप आयकॉन म्हणून नावारूपाला आली.

ही अभिनेत्री म्हणजे रागेश्वरी लोम्बा. करिअर उत्तम दिशेने वाटचाल करत असतानाच नशिबाने तिच्यावर मोठा आघात केला. एका म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगदरम्यान तिला मलेरिया झाला. त्यानंतर तिची तब्येत झपाट्याने खालावली आणि अल्बम रिलीज झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात तिला बेल्स पाल्सी या गंभीर आजाराचे निदान झाले.

वयाच्या केवळ 25 व्या वर्षी रागेश्वरीला बेल्स पाल्सी झाला. या आजारामुळे तिच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला अर्धांगवायू झाला होता. तिला नीट बोलता येत नव्हतं. या आजाराने तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. ग्लॅमर आणि यशाच्या शिखरावर असलेलं करिअर अचानक थांबलं आणि तिला इंडस्ट्रीपासून दूर व्हावं लागलं.

या आजारपणामुळे रागेश्वरी तब्बल चार वर्षे अंथरुणाला खिळून होती. मात्र, या कठीण काळात तिने हार मानली नाही. फिजिओथेरपीसोबतच तिने योगाकडे वाटचाल केली. हाच योग तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार ठरला.

आज रागेश्वरी स्वतःच्या अनुभवांतून अनेकांना मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करत आहे.

ती आज एका 10 वर्षांच्या मुलीची आई आहे आणि पूर्णपणे वेगळ्या, समाधानी आयुष्याचा आनंद घेत आहे.