परफ्युम निवडताना गोंधळ होतोय? EDP आणि EDT शब्दांवरुन ओळखा बेस्ट कोणता?
परफ्युम खरेदी करताना त्यावर लिहिलेले EDP आणि EDT म्हणजे काय? सुगंध किती काळ टिकेल हे यावर कसे अवलंबून असते? तुमच्या व्यक्तिमत्त्वासाठी योग्य परफ्युम निवडण्यासाठी ही सविस्तर माहिती नक्की वाचा.

आपण अनेकदा दुकानात परफ्यूमचा सुगंध बघून तो विकत घेतो, पण घरी आल्यावर त्याचा वास लगेच उडतो. चांगला परफ्यूम निवडणे ही एक कला आहे. केवळ किंमतीवरून नव्हे, तर त्याच्या रचनेवरून त्याची गुणवत्ता कशी ओळखावी, याबद्दलची माहिती घेऊया.

उच्च दर्जाच्या परफ्यूमचा सुगंध काळानुसार बदलत जातो. यात टॉप, हार्ट आणि बेस नोट्स असे तीन थर असतात. सुरुवातीला येणारा सुगंध थोड्या वेळाने बदलतो आणि शेवटी एक गडद, सौम्य वास रेंगाळत राहतो. जर एखाद्या परफ्यूमचा वास सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखाच असेल, तर तो कृत्रिम आणि स्वस्त असण्याची शक्यता असते.

परफ्यूम किती वेळ टिकेल हे त्याच्या प्रकारावर अवलंबून असते. बाटलीवर EDP (Eau de Parfum) असेल तर तो ६ ते ८ तास टिकतो. EDT (Eau de Toilette) चा सुगंध त्यामानाने कमी काळ टिकतो. जर महागडा परफ्यूम असूनही तास-दोन तासांत वास गेला, तर त्याच्या गुणवत्तेत त्रुटी असू शकते.

चांगल्या परफ्यूममध्ये नैसर्गिक घटक जसे की फुले, मसाले किंवा लाकडाचा अर्क असतो. स्प्रे केल्यावर लगेच अल्कोहोलचा किंवा स्पिरीटचा तीव्र वास येत असेल किंवा डोकेदुखी होत असेल, तर तो परफ्यूम कमी दर्जाचा समजावा.

दर्जेदार परफ्यूम त्वचेवर जळजळ किंवा चिकटपणा निर्माण करत नाही. बाटलीतील द्रव नेहमी स्वच्छ आणि पारदर्शक असावा. जर द्रव गढूळ दिसत असेल, तर तो परफ्यूम खराब झालेला असू शकतो.

ब्रँडेड परफ्यूमची बाटली आणि स्प्रे नोजल अतिशय गुळगुळीत असते. स्प्रे केल्यावर तो पाण्याचा फवारा न उडता बारीक धुक्यासारखा (Mist) बाहेर आला पाहिजे. तसेच, बाटली आणि बॉक्सवरचा बॅच कोड (Batch Code) सारखाच असल्याची खात्री करा.

तुमचा सुगंध किती दूरपर्यंत पसरतो आणि तुम्ही तिथून निघून गेल्यावरही तुमचा सुगंध तिथे किती वेळ रेंगाळतो, यावरून तुमच्या परफ्यूमची ताकद समजते. एक उत्तम परफ्यूम उग्र नसून सभोवताली सुखद वातावरण निर्माण करतो.

प्रत्येक महागडा परफ्यूम सर्वांनाच शोभतो असे नाही. तुमच्या आवडीनुसार आणि व्यक्तिमत्त्वाला साजेसा सुगंध निवडा. जो सुगंध दिवसभराच्या थकव्यानंतरही तुमच्या कपड्यांवर हलकासा जाणवत राहतो, तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.