
बुधवार, रविवार म्हटलं की प्रत्येक घरात मासांहाराचा बेत ठरलेला असतो. बहुतांश कुटुंब मासांहारात मटण किंवा चिकनला जास्त पसंती देतात. मटण चवीला उत्तम असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. पण त्याची खरेदी करताना आपण अनेकदा गोंधळतो.

मटण आणि चिकन खरेदी करताना कधी कधी आपल्याला शिळं देऊन फसवणूकही केली जाते. पोषणतज्ज्ञांच्या मते, शिळे किंवा खराब झालेले मांस खाल्ल्याने पोटाचे गंभीर विकार होऊ शकतात. त्यामुळे मांस खरेदी करण्यापूर्वी त्याचे रंग, रूप आणि वास यांवरून त्याचा ताजेपणा ओळखणे अत्यंत गरजेचे आहे.

ताजे कापलेले मटण नेहमी लाल रंगाचे असते. जर मांसाचा रंग काळपट किंवा फिकट झाला असेल, तर ते शिळे असण्याची शक्यता असते. खूप जास्त गडद लाल रंगाचे मांस देखील खरेदी करणे टाळावे.

मांस हातात धरून पाहिल्यास त्याचा ताजेपणा चटकन लक्षात येतो. ताजे मांस नेहमी घट्ट आणि लवचिक असते. जर मांस हाताला चिकट किंवा निसरडे लागत असेल, तर ते बरेच दिवस साठवून ठेवलेले आहे, असे समजावे.

ताज्या मांसाला कोणताही विशिष्ट उग्र किंवा कुबट वास येत नाही. दुकानातून मांस घेताना किंवा ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर त्याला थोडा जरी उग्र वास येत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

ताजे मटण ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे त्यातील चरबीचा रंग पाहणे. ताज्या मांसाची चरबी पांढरीशुभ्र असते. जर ही चरबी पिवळसर दिसत असेल, तर ते मांस साठवलेले असते. तसेच, कोवळ्या मांसाची हाडे मऊ आणि पांढरी असतात.

यासाठी आपण नेहमी परवानाधारक आणि स्वच्छ दुकानांमधूनच मटण किंवा चिकन खरेदी करावे. रस्त्यावरील उघड्यावर मिळणारे किंवा अस्वच्छ ठिकाणचे मांस खरेदी करणे टाळावे.

मांस चिवट असल्यास ते शिजण्यास कठीण जाते आणि पचनास देखील जड पडते. त्यामुळे आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चिकन खरेदी करायला जाल, तेव्हा या साध्या पण महत्त्वाच्या टिप्स नक्की लक्षात ठेवा.