Mahesh Kothare : मी लक्ष्याला सायनिंग अमाउंट म्हणून एक रुपया…महेश कोठारे यांनी सांगितलेला ‘धुमधडाका’ सिनेमाचा किस्सा
Mahesh Kothare On Laxmikant Berde : महेश कोठारे यांनी एका जुन्या मुलाखतीत 'धुमधडाका' या सिनेमाचा किस्सा सांगितला होता.

मराठी चित्रपटसृष्टीत विनोदाची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची जोडी प्रेक्षकांच्या आजही विशेष लक्षात आहे. ‘धुमधडाका’, ‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘झपाटलेला’, ‘धडाकेबाज’ अशा अनेक चित्रपटांमधून या जोडीनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. मात्र, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री नेमकी कशी सुरू झाली, याचा एक रंजक किस्सा महेश कोठारे यांनी सांगितला होता.
महेश कोठारे यांनी १९८५ मध्ये ‘धुमधडाका’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट हिंदीतील ‘प्यार किये जा’ या चित्रपटावर आधारित होता. हिंदी चित्रपटात अभिनेते मेहमूद यांनी साकारलेली भूमिका महेश यांना विशेष आवडली होती. मराठीतही ही भूमिका तितक्याच ताकदीनं साकारणारा कलाकार त्यांना हवा होता. चित्रपटातील किशोर कुमार यांच्या भूमिकेसाठी अशोक सराफ आणि शशी कपूर यांच्या भूमिकेसाठी स्वतः महेश कोठारे यांची निवड निश्चित होती. मात्र, मेहमूद यांच्या भूमिकेसाठी योग्य कलाकार मिळत नव्हता. त्यांचा शोध सुरू असतानाच एक अनपेक्षित योग जुळून आला.
त्यावेळी महेश कोठारे यांच्या आई-वडिलांसह आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू यांच्या संचातील ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे नाटक रंगभूमीवर गाजत होतं. या नाटकाचे अनेक प्रयोग झाले होते. बबन प्रभू यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बबन प्रभू यांच्या भूमिकेसाठी एका नव्या कलाकाराची निवड करण्यात आली होती. तो कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे! महेश कोठारे यांनी नाटकाच्या तालमीदरम्यान लक्ष्मीकांत यांचा अभिनय पाहिला आणि ते अक्षरशः प्रभावित झाले. महेश यांच्या लक्षात आलं की, मेहमूद यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी लक्ष्मीकांत बेर्डे अगदी योग्य आहेत. त्यांनी लगेचच लक्ष्मीकांत यांच्याशी चित्रपटाबद्दल चर्चा केली आणि त्यांना ‘धुमधडाका’साठी विचारणा केली.
सायनिंग अमाउंट म्हणून दिला फक्त एक रुपया
लक्ष्मीकांत यांनी चित्रपटासाठी होकार दिल्यानंतर महेश यांनी खिशातून एक रुपया काढला आणि त्यांना सायनिंग अमाउंट म्हणून दिला. महेश म्हणाले होते, ‘मी त्याला सायनिंग अमाउंट म्हणून एक रुपया दिला आणि त्यानंही तितक्याच गांभीर्यानं माझ्याकडून तो एक रुपया घेतला. त्यावेळी माझ्या फायनान्सचा काहीच पत्ता नव्हता. पटकथाही व्यवस्थित तयार नव्हती. पण मला मेहमूदच्या भूमिकेसाठी कलाकार मिळाला होता. हा एक रुपया केवळ मानधन नव्हता, तर दोन कलाकारांमधील आयुष्यभर टिकलेल्या मैत्रीची सुरुवात होती.
‘धुमधडाका’ चित्रपटामुळे महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. पुढे दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांना विनोदी भूमिकांमधील त्यांची क्षमता दाखवण्याची मोठी संधी या चित्रपटामुळे मिळाली.
