
अनेकदा लोक अंगावर किंवा कपड्यांवर भरमसाठ परफ्यूम फवारतात, पण तासाभरातच त्याचा वास निघून जातो. परफ्यूम लावणे ही एक कला आहे. जर तो शरीराच्या योग्य भागांवर लावला, तर अगदी कमी प्रमाणात वापरूनही त्याचा सुगंध दिवसभर राहतो.

पल्स पॉइंट्स म्हणजे शरीराचे असे भाग जिथे रक्तवाहिन्या त्वचेच्या अगदी जवळ असतात. या भागांमध्ये शरीराची उष्णता जास्त असते. ही उष्णता परफ्यूममधील अर्काला (Essential Oils) हळूहळू हवेत सोडण्याचे काम करते, ज्यामुळे सुगंध दीर्घकाळ टिकतो.

आपल्या शरीरातील सर्वात सामान्य पल्स पॉईंट म्हणजे दोन्ही मनगट. येथे नाडीचे ठोके जाणवतात, ज्यामुळे उष्णता निर्माण होते आणि सुगंध पसरण्यास मदत होते. परफ्यूम लावल्यानंतर मनगटे एकमेकांवर घासून नका, यामुळे सुगंधाचे रेणू तुटतात आणि वास लवकर उडतो.

कानांच्या मागची त्वचा थोडी तेलकट असते. तेल परफ्यूमला धरून ठेवते, त्यामुळे तुम्ही कोणाशी संवाद साधत असताना त्यांना तुमच्या सुगंधाचा मंद भास होतो.

गळ्याच्या खालच्या भागात म्हणजे कंठाजवळ परफ्यूम लावल्याने तो तुमच्या चेहऱ्याच्या जवळ राहतो. यामुळे तुम्ही हलताना किंवा बोलताना सुगंध दरवळतो.

कोपराच्या आतील बाजू सतत दुमडली जाते. ज्यामुळे तिथे ऊब निर्माण होते. हा भाग परफ्यूमसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. तसेच गुडघ्यांच्या मागे परफ्युम लावावा. हा भाग बऱ्याचदा दुर्लक्षित राहतो. पण विज्ञानानुसार, सुगंध खालून वरच्या दिशेने प्रवास करतो. त्यामुळे गुडघ्यांच्या मागे परफ्यूम लावल्याने तो खालून वरपर्यंत दरवळतो.

शर्ट किंवा कपड्यांच्या आत थेट त्वचेवर परफ्यूम लावल्याने शरीराच्या नैसर्गिक उष्णतेमुळे तो हळूहळू बाहेर येतो. जर तुम्ही स्कर्ट किंवा हाफ पँट घातली असेल, तर पायांच्या घोट्याला (Ankle) परफ्यूम लावणे फायदेशीर ठरते. तुम्ही चालताना तुमच्या पावलांसोबत सुगंधाचा मागोवा मागे राहतो.

कोरड्या त्वचेपेक्षा तेलकट किंवा मॉइश्चराईज केलेल्या त्वचेवर परफ्यूम जास्त काळ टिकतो. परफ्यूम लावण्यापूर्वी त्या जागेवर थोडे पेट्रोलियम जेली किंवा वासाशिवायचे लोशन लावा. परफ्यूम फवारताना शरीरापासून ५-७ इंच लांबून फवारावा. परफ्यूम नेहमी थेट त्वचेवर लावावा. कपड्यांवर लावल्याने काही वेळा डाग पडू शकतात. तसेच सुगंधही नैसर्गिकरीत्या विकसित होत नाही.