
जर तुमच्या घराचा विजेचा वापर कमी असूनही बिल जास्त येत असेल, तर त्यामागे तुमच्या काही सवयी कारणीभूत असू शकतात. अनेकदा आपण उपकरणे वापरून झाल्यावर फक्त रिमोटने बंद करतो. पण प्लग सॉकेटमध्येच ठेवतो. यामुळे फँटम लोड (Phantom Load) वाढतो आणि विजेचे बिल विनाकारण वाढते.

जर तुम्हाला वीज बिलात थेट कपात करायची असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काही उपकरणे अनप्लग करायला अजिबात विसरु नका. यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा त्रास कमी होऊन शांत झोप लागते. तसेच गॅझेट्स जास्त काळ टिकतात आणि शॉर्ट सर्किटचा धोका टळतो.

वायफाय राउटर : रात्री इंटरनेटची गरज नसते, तरीही राउटर सुरू असल्यास त्यातून निघणाऱ्या लहरी तुमच्या झोपेवर परिणाम करू शकतात. तो बंद केल्याने वीजही वाचते.

फोन आणि लॅपटॉप चार्जर : अनेकांना रात्रभर फोन चार्जिंगला लावण्याची सवय असते. चार्जिंग पूर्ण झाल्यावरही चार्जर वीज ओढत राहतो. तसेच यामुळे बॅटरी खराब होण्याचा किंवा स्फोट होण्याचा धोका असतो.

गीझर आणि हीटर: ही उच्च व्होल्टेजची उपकरणे आहेत. हिवाळ्यात यांचा वापर वाढतो, पण काम झाल्यावर प्लग काढून ठेवणेच सुरक्षित आहे. यामुळे मोठी दुर्घटना टाळता येईल.

स्मार्ट टीव्ही: टीव्ही केवळ रिमोटने बंद करू नका, तर मुख्य स्वीच बंद करून प्लग बाहेर काढा. स्टँडबाय मोडवर असलेला टीव्ही सतत वीज वापरत असतो.

एक्सटेंशन कॉर्ड आणि मल्टीप्लग: एकाच प्लगवर जास्त भार असल्यास ओव्हरहीटिंग होऊन आग लागण्याची शक्यता असते. काम संपल्यावर हे बोर्ड अनप्लग करणे शहाणपणाचे ठरेल.

त्यामुळे केवळ ही सवय बदलल्याने तुम्ही तुमचे घर अधिक सुरक्षित बनवू शकता आणि खिशावर पडणारा विजेचा बोजाही कमी करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी घरातील गरज नसलेली सर्व उपकरणे अनप्लग करणे तुमच्या आरोग्यासाठी आणि उपकरणांच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. त्यामुळे आज रात्रीपासूनच ही खबरदारी घ्या आणि अनावश्यक वीज खर्च टाळा.