
नांदेडसारख्या जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पावसाने कहर केला. या जिल्ह्यात काही ठिकाणी महापूर आला. अनेक घरे पाण्याखाली गेली. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली.

आता ऑगस्ट महिना सरला असून सप्टेंबर महिना चालू झाला आहे. या महिन्यातही पावसाचा असाच कहर चालू राहणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असतानाच आता हवामान विभागाचा नवा अंदाज समोर आला आहे.

भारतीय हवामान विभागाने संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा असेल, याचा एक अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या पावसाबाबतही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा महिना महाराष्ट्रासाठी महासंकटाचा असेल की दिलासादायक असेल हे समोर आले आहे.

समोर आलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार सप्टेंबर 2025 मध्ये देशाच्या बहुतेक भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही राज्यांची चिंता वाढणार आहे. तर काही राज्यांसाठी चिंताजनक स्थिती नसली तरी काळजी घ्यावी लागणार आहे.

ईशान्य व पूर्व भारतातील काही भाग, दक्षिण भारतातील अनेक भाग, उत्तर भारताच्या काही भागांत सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे शेतीपिकाच्या नुकसानीचा फार काही धोका नसेल.

महाराष्ट्रातील पावसाबद्दलही हवामान विभागाने सांगितले आहे. या अंदाजानुसार राज्यातील पाऊस समाधानकारक असण्याची शक्यता दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2025 मध्ये संपूर्ण देशभरात मासिक सरासरी पाऊस 109 टक्के असण्याची शक्यता आहे.