
भारतीय महिला संघाने प्रथमच महिला एकदिवसीय विश्वचषकांचं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्मा पहिल्यावहिल्या ऐतिहासिक विश्वविजयाची शिल्पकार ठरली.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या अंतिम सामन्यात दिप्ती शर्माने ५८ धावा आणि ५ विकेट्स घेतल्या. दिप्ती शर्माला ओळखत नाही, असा व्यक्ती आता भारतात शोधून सापडणार नाही. आग्र्यातील एका सामान्य कुटुंबातून क्रिकेटच्या मैदानावर आपली प्रतिभा सिद्ध करण्यापर्यंतचा तिचा प्रवास हा प्रेरणा आणि अटळ संघर्षाने भरलेला आहे.

आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर दीप्तीने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. दीप्तीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण म्हणजे २०२५ चा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक.

भारताच्या पहिल्या-वहिल्या विश्वचषक विजयात दीप्ती शर्माने 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून निवड होऊन इतिहास रचला. या स्पर्धेत तिने २०० हून अधिक धावा आणि २२ विकेट्स घेऊन भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

२४ ऑगस्ट १९९७ रोजी सुशीला आणि भगवान शर्मा यांच्या पोटी दीप्तीचा जन्म झाला. तिचे वडील आणि आई भारतीय रेल्वेचे निवृत्त कर्मचारी आहेत. तर दीप्ती ही सर्व भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या दीप्तीला वयाच्या ९ व्या वर्षी क्रिकेटमध्ये रस निर्माण झाला.

दीप्तीचा सुरुवातीचा प्रवास तिचा मोठा भाऊ आणि उत्तर प्रदेशचा माजी वेगवान गोलंदाज सुमित शर्मा यांच्यासोबत जोडलेला आहे, ज्याने तिला सुरुवातीला प्रशिक्षण दिले. आग्रा येथील एकलव्य स्पोर्ट्स स्टेडियममध्ये एक दिवस नेट प्रॅक्टिस सुरू असताना दीप्तीला ५० मीटर अंतरावरून चेंडू पुन्हा खेळात फेकायला सांगितला गेला. तिचा अचूक आणि वेगवान थ्रो थेट स्टंपवर आदळला.

भारतीय महिला संघाच्या निवडकर्त्या हेमलता कला यांनी हे पाहिले आणि सुमितला सांगितले, या मुलीला क्रिकेट खेळू दे, ती एक दिवस देशासाठी खेळेल. हा एकच थ्रो दीप्तीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.

एका सामान्य कुटुंबातून आलेल्या दीप्तीला अनेक टोमण्यांना आणि आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, तिच्या कुटुंबाचा, विशेषतः वडील, आई आणि भावाचा तिला पूर्ण पाठिंबा मिळाला.

२०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या दीप्तीने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. तर WPL (महिला प्रीमियर लीग) मध्ये हॅटट्रिक घेणारी पहिली भारतीय गोलंदाज आहे.

क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारने तिची पोलिस उपअधीक्षक (DySP) म्हणून नियुक्ती केली आहे. (सर्व फोटो - दिप्ती शर्मा/ इन्स्टाग्राम)