
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 8 वा सामना आज (16 एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या पर्वात दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही संघांनी या मोसमातील पहिला सामना खेळला आहे. चेन्नईला पहिल्या मॅचमध्ये दिल्लीकडून पराभव स्वीकारावा लागला. तर पंजाबने राजस्थानचा पराभव केला होता.

मागील मोसमात दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये पोहचता आले नव्हते. 13 व्या मोसमात हे उभयसंघ 2 वेळा आमनेसामने भिडले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये चेन्नईने पंजाबवर विजय मिळवला होता. चेन्नईने पंजाबवर पहिल्या सामन्यात 10 तर दुसऱ्या मॅचमध्ये 9 विकेट्सने विजय मिळवला होता.

आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये चेन्नई पंजाबवर वरचढ राहिली आहे. चेन्नईने 14 मॅचमध्ये पंजाबचा पराभव केला आहे. तर पंजाबनेही 9 सामन्यांमध्ये चेन्नईवर मात केली आहे.

आजच्या सामन्यात चेन्नईसमोर पंजाबचा कर्णधार केएल राहुलचे आव्हान असणार आहे. केएलने चेन्नई विरुद्ध 262 धावा फटकावल्या आहेत. तर चेन्नईकडून पंजाब विरुद्ध सुरेश रैनाने सर्वाधिक 711 धावा केल्या आहेत.

तर चेन्नईचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्होने पंजाबच्य 11 फलंदाजांना बाद केलं आहे. तर पंजाबकडून मोहम्मद शमीने चेन्नई विरुद्ध 2 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.