
फिरायला जाणं आवडतं नाही, असा माणूस जगात शोधून सापडणार नाही. आपण नेहमीच धकाधकीच्या आयुष्य जगत असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला फिरण्याची प्रचंड इच्छा असते. पण फिरायला जायचं म्हटलं की खर्चाचा प्रश्न येतो आणि मग अनेक प्लॅन्स तसेच राहतात.

पण जर तुम्हाला फक्त २५ रुपयात संपूर्ण भारताचा प्रवास करता आला, तर किती मस्त ना! फिरण्याची आवड असलेल्यांना अशी एक अविश्वसनीय संधी चालून आली आहे.

'जागृती यात्रा' नावाची एक विशेष ट्रेन तुम्हाला फक्त 25 रुपयांत संपूर्ण भारताचा प्रवास घडवते. 'उद्योजकतेच्या माध्यमातून भारताचे निर्माण' हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. गेली 16 वर्षे ही ट्रेन सुरु आहे.

जागृती एक्सप्रेसमध्ये एकावेळी केवळ 500 प्रवाशांना प्रवास करता येतो. ही ट्रेन वर्षातून फक्त एकदाच धावते. त्यामुळे यात प्रवास करण्यासाठी तुम्हाला काही महिने आधी बुकिंग करावी लागते.

दरवर्षी मे महिन्यात या ट्रेनचे बुकिंग सुरू होते. नोव्हेंबरमध्ये या यात्रेला सुरुवात होते. जागृती एक्सप्रेस 15 दिवसांत 800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. या प्रवासादरम्यान प्रवाशांना उद्योजकतेचे बारकावे शिकवले जातात, ज्यामुळे हा प्रवास केवळ मनोरंजकच नव्हे तर माहितीपूर्ण देखील ठरतो.

या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुमचे वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचे आहे. या वयोगटाबाहेरील व्यक्तींना या ट्रेनमध्ये प्रवास करता येत नाही.

ही ट्रेन अनेक तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना भेट देते. ज्यामुळे प्रवाशांना भारताची समृद्ध संस्कृती आणि वैविध्य जवळून अनुभवता येते.

ही ट्रेन दिल्लीपासून आपला प्रवास सुरू करते. दिल्लीनंतर तिचा पहिला थांबा अहमदाबाद येथे येतो. त्यानंतर जागृती एक्सप्रेस मुंबई आणि बंगळूरुमधून जात मदुराईला पोहोचते. मदुराईनंतर ती ओडिशाला जाते आणि त्यानंतर मध्य भारतात प्रवेश करते. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी फिरल्यानंतर, शेवटी ही ट्रेन पुन्हा दिल्लीला परत येते.

जर तुम्ही 2025 मध्ये या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आताच यासाठी बुकिंग करावी लागेल. यंदा ही ट्रेन 7 नोव्हेंबरला आपला प्रवास सुरू करेल आणि 22 नोव्हेंबरला दिल्लीला परत येईल.

या ट्रेनमध्ये सीट आरक्षित करण्यासाठी तुम्हाला https://www.jagritiyatra.com/ या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. यात तिकीट आणि सीट बुक करण्याची प्रक्रिया किचकट आहे. या वर्षी तिकीट बुक करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर आहे.