
लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपाचं केंद्र होतं, सोलापूरच्या ईशान्येला 70 किमी अंतरावरचं किल्लारी गाव. पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवले.

6.4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. या भूकंपात 7 हजार 928 लोकांनी आपला जीव गमावला. तर 16 हजार लोक जखमी झाले. 15 हजार 854 जनावरं मृत्यूमुखी पडली.

हा भूकंप केवळ किल्लारीपुरता मर्यादित नव्हता. तर लातूर आणि उस्मानाबादच्या 52 गावांवर त्याचा प्रभाव पडला. भूकंपात 30 घरं जमीनदोस्त झाली होती. तर 13 जिल्ह्यातील 2 लाख 11 हजार घरांना तडे गेले होते.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला होता. लोकांनी सारंकाही गमावलं होतं.

किल्लारी भूकंपाने एक पिढीच उद्ध्वस्त केली होती. आजूबाजूच्या 52 गावांतील हजारो संसार उघड्यावर आले होते. या भूकंपाने गावं जमीनदोस्त केली. अनेकांच्या काळजाला भरून न येणाऱ्या जखमा झाल्या.