
जर तुम्ही चांगल्या चित्रपटांचे आणि वेब सीरिजचे चाहते असाल, तर त्यात भाषेचा कोणताही अडथळा येत नाही. 'सुझल: द व्हॉर्टेक्स' ही तमिळ भाषेतील सर्वोत्कृष्ट क्राइम थ्रिलरपैकी एक आहे. याची कथा दक्षिण भारतातील एका लहान गावातील दहा दिवसांच्या उत्सवादरम्यान उलगडते.

एक किशोरवयीन मुलगी अचानक बेपत्ता होते आणि जसजसा तपास सुरू होतो, तसतशी गावातील अनेक लपलेली रहस्ये समोर येऊ लागतात. यामध्ये ऐश्वर्या राजेश, श्रिया रेड्डी आणि कथिर यांच्या मुख्य भूमिका असून IMDb वर त्याला 8.1 रेटिंग मिळाली आहे. ही सीरिज तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकता.

'पाताल लोक' ही सीरिज तर अनेकांना माहीत असेल. एका नामांकित पत्रकारावरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी एक सामान्य पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. यामध्ये श्रीमंत, सर्वसामान्य आणि गुन्हेगारी विश्वाचं चित्रण अत्यंत वास्तववादी पद्धतीने केलं आहे. ही सीरिज तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकता.

पंजाबमधील एका ग्रामीण भागात घडणारी गूढ रहस्यमयी कथा 'कोहरा'मध्ये दाखवण्यात आली आहे. लग्नाच्या एक दिवस आधी एका अनिवासी भारतीय तरुणाची हत्या होते आणि या हत्येचा तपास दोन पोलीस अधिकारी करत असतात. नेटफ्लिक्सवर ही सीरिज उपलब्ध असून नुकताच त्याचा दुसरा सिझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सेक्रेड गेम्स ही प्रचंड गाजलेली सीरिज आहे. एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याला अचानक एका कुख्यात गुंडाचा फोन येतो, जो त्याला त्याच्या शहरावरील धोक्याबद्दल सावध करतो. गुन्हेगारी, राजकारण आणि धर्म यांचा एक प्रभावी मिलाफ या कथेत दिसून येतो. ही सीरिज नेटफ्लिक्सवर तुम्ही पाहू शकता.

'बॉम्बे मेरी जान' या सीरिजमध्ये 1960 च्या दशकातील मुंबईत घडणारी कथा दाखवण्यात आली आहे. कुटुंब आणि महत्त्वाकांक्षा यांच्यातील संघर्ष अत्यंत प्रभावीपणे याच चित्रित करण्यात आला आहे. ही सीरिजसुद्धा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

'तब्बर' ही सीरिज एका अशा कुटुंबाची कथा सांगते, जिथे एका चुकीमुळे सर्वकाही बदलून जातं. नकळत हत्या करणाऱ्या आपल्या मुलाला वाचवण्यासाठी एक निवृत्त पोलीस अधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज उपलब्ध आहे.

सत्य घटनांवर आधारित ही सीरिज 1970 च्या दशकात महाराष्ट्रात घडलेल्या हत्यांच्या मालिकांची कथा सांगते. अंधश्रद्धा आणि लोभ यांमुळे एका गावात गुन्हे घडतात. एक अनुभवी तपास अधिकारी हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करतो. 'मानवत मर्डर्स' असं या सीरिजचं नाव असून सोनी लिववर ती उपलब्ध आहे.