
'बिग बॉस मराठी 5'च्या घरात स्पर्धकांना साठहून अधिक दिवस झाले आहेत. या घरात आता बहुप्रतिक्षित ‘फॅमिली वीक’ टास्क सुरू झालेला आहे. ‘बिग बॉस’मध्ये ‘फॅमिली वीक’ सुरू झाल्याचं पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

आता कुटुंबीय येऊन घरातील सदस्यांना काय सल्ला देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या भागात मुंबईत कधीही पाऊल न ठेवलेले अंकिता वालावलकरचे बाबा तिला भेटण्यासाठी 'बिग बॉस मराठी'च्या घरात आलेले पाहायला मिळणार आहेत.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो सर्वांनाच भावूक करणारा आहे. या प्रोमोममध्ये अंकिताला भेटण्यासाठी सर्वात आधी तिच्या दोन बहिणी आलेल्या दिसत आहेत. बहिणींची भेट होत असतानाच घरात तिच्या वडिलांची एन्ट्री होते.

बिग बॉस मराठीच्या घरात अंकिता आणि तिच्या बाबांचा अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळणार आहे. मुंबईत कधीही पाऊल न ठेवलेले अंकिताचे बाबा पहिल्यांदाच आपल्या लाडक्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईत आले आहेत.

अंकितासाठी हा सुखद धक्का होता. प्रत्येक लेकीसाठी आपला बाबा हा खूप खास असतो. अंकितासाठीदेखील तिचा बाबा खूप स्पेशल असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्याचसोबत तिच्या दोन बहिणीसुद्धा बिग बॉसच्या घरात अंकिताला भेटायला आल्या आहेत.