
कोल्हापूर जिल्ह्यात लग्न समारंभात अनोळखी पाहुण्यासारखा वावरत महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्याला कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

बाळासो उर्फ अजित पाटील असे या चोरट्याचे नाव असून तो कोल्हापुरातील आदमापूरमधील रहिवाशी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल चार लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासो हा लग्नसमारंभात कोल्हापुरी फेटा बांधून अगदी जवळच्या नातेवाईकासारखा वावरायचा. यानंतर संधी मिळताच तो महिलांच्या दागिन्यांवर हात साफ करायचा.

त्याची चोरी करण्याची पद्धत इतकी अनोखी होती की यामुळे तो अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या हुशारीने त्याच्या मुसक्या आवळल्या.

यानंतर त्याने तब्बल २१ गुन्ह्यांची कबुली पोलिसांकडे दिली आहे. विशेष म्हणजे, त्याने केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पुणे, सांगली आणि सातारा येथील लग्न समारंभांमध्येही चोऱ्या केल्या आहेत.

चोरी केलेले दागिने तो लगेच विकायचा नाही. तर स्टीलच्या डब्यात भरून जमिनीमध्ये पुरून ठेवायचा. पोलिसांनी त्याच्याकडून जमिनीतून पुरलेले दागिनेही शोधून काढले आहेत.

या घटनेमुळे लग्नसमारंभात येणाऱ्या अनोळखी आणि संशयास्पद व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कोल्हापुरी फेटा बांधलेला कोणताही अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.