
कुठल्याच भारतीय खाद्यपदार्थाला मसाल्यांशिवाय चव येत नाही. खाद्यपदार्थ चवदार करण्यासाठी मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये मसाले असतात. मात्र, हे मसाले फक्त अन्नाची चवच वाढवत नाहीतर ते आपल्या आरोग्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहेत.

मसाल्यांचा आहारात समावेश करून आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतो. तसेच मसाल्यांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

कोरोनाच्या काळामध्ये निरोगी राहण्यासाठी आहारामध्ये जास्तीत-जास्त मसाल्यांचा समावेश करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला होता. इतकेच नाहीतर मसाले आपले वजन कमी करण्यासही मदत करतात.

जेवणाची चव वाढवण्यासाठी विविध मसाल्यांचा वापर केला जातो. पण उन्हाळ्यात काही मसाले वापरताना काळजी घ्यायला हवी. त्यांचे अतिसेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

उन्हाळ्यात लाल तिखट जास्त प्रमाणात खाऊ नये. त्याचा जास्त वापर केल्याने पोटातील उष्णता वाढण्याची शक्यता असते. बरेच लोक खाद्यपदार्थांमध्ये लाल तिखट जास्त प्रमाणात वापरतात. त्याचा आरोग्यावर खराब परिणाम होतो.

उन्हाळ्यात लाल मिरचीचे जास्त सेवन केल्याने शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे पोट आणि छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. यामुळेच लाल तिखट कमी खा.

बरेच लोक आल्याचे जास्त प्रमाणात सेवन करतात. विशेष: चहामध्ये आले टाकले जाते. आले केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर त्याच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

उन्हाळ्याच्या हंगामात अतिप्रमाणात आल्याचे सेवन केल्याने जुलाब, छातीत जळजळ आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. यामुळेच या हंगामात आल्याचे सेवन कमी करा किंवा करूच नका.

लसूणाचा वापर जास्त करून भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र उन्हाळ्याच्या हंगामात लसणाचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे. जास्त सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढते.

काळी मिरी चवीला गरम असते. त्यामुळे अन्नाला तिखट चव येते. पण उन्हाळ्यात याचे सेवन कमी प्रमाणात करावे. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने छातीत जळजळ किंवा ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतो.