तासनतास साफसफाई करण्याची गरज नाही! जपानी लोकांच्या या सोप्या सवयींनी घर दिसेल चकाचक

घर स्वच्छ ठेवण्यासाठी रोज तासनतास साफसफाई करण्याची गरज नाही. जपानी लोकांच्या काही सोप्या सवयींचा अवलंब केल्यास कमी वेळातही घर नीटनेटके आणि चकाचक ठेवता येऊ शकते.

तासनतास साफसफाई करण्याची गरज नाही! जपानी लोकांच्या या सोप्या सवयींनी घर दिसेल चकाचक
cleaning
| Edited By: | Updated on: Oct 14, 2026 | 3:52 PM

घराची साफसफाई म्हटलं की अनेकांना तासनतास झाडू-पोछा करणे, धूळ पुसणे आणि पसारा आवरणे ही कामं आठवतात. पण काही छोट्या सवयी अंगीकारल्या, तर रोजच्या साफसफाईचा ताण बराच कमी होऊ शकतो. जपानमध्ये स्वच्छता, शिस्त आणि वस्तू जागच्या जागी ठेवण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे घरात घाण साचू न देणे आणि वापरलेल्या वस्तू लगेच आवरणे यांसारख्या सवयी दैनंदिन जीवनाचा भाग बनतात. तुम्हालाही कमी वेळात घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं असेल, तर जपानी लोकांच्या या सात सोप्या सवयी नक्की जाणून घ्या.

घरात बाहेरचे बूट घालू नका

Loading...

बाहेरून घरात येताना बुटांसोबत धूळ, माती आणि इतर घाणही आत येते. त्यामुळे घराच्या दाराजवळच बूट काढण्याची सवय लावा. बूट ठेवण्यासाठी स्वतंत्र रॅक ठेवा आणि घरात वापरण्यासाठी वेगळ्या चपला वापरा.

टॉयलेटसाठी वेगळ्या चपला ठेवा

टॉयलेटमधील अस्वच्छता घराच्या इतर भागांत पसरू नये, यासाठी तिथे वापरण्यासाठी स्वतंत्र चपला ठेवा. या चपला घरातील इतर ठिकाणी वापरू नका. त्यांची नियमित स्वच्छता करा आणि वापरानंतर योग्य जागी ठेवा.

घाण साचण्यापूर्वीच साफ करा

किचनच्या ओट्यावर तेलाचे डाग पडणे, जेवणाच्या टेबलावर अन्न सांडणे किंवा फरशीवर काही पडणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. शक्य तितक्या लवकर ती जागा स्वच्छ करा. स्वयंपाक झाल्यानंतर ओटा पुसणे आणि जेवणानंतर टेबल आवरणे अशा सवयी लावून घ्या.

घरात अनावश्यक वस्तू जमा करू नका

घरात गरजेपेक्षा जास्त वस्तू असल्यास साफसफाई करणे कठीण होते. कपाटांमधील जुने कपडे, रिकामे बॉक्स, निरुपयोगी कागद आणि वापरात नसलेल्या वस्तू वेळोवेळी बाजूला करा. गरजेच्या वस्तूंसाठी ठरावीक जागा निश्चित करा. वस्तू वापरल्यानंतर पुन्हा त्याच जागी ठेवल्यास घरात पसारा होणार नाही.

घरात ताजी हवा खेळती ठेवा

घर स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ फरशी आणि फर्निचर पुसणे पुरेसे नाही. घरात हवा खेळती राहणेही महत्त्वाचे आहे. बाहेरील हवेची गुणवत्ता चांगली असताना काही वेळ खिडक्या उघडा. चादरी, उशांचे कव्हर आणि पडदे नियमित स्वच्छ करा. यामुळे घरातील ताजेपणा टिकवण्यास मदत होईल.

मुलांनाही स्वच्छतेच्या सवयी लावा

घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ एका व्यक्तीवर न ठेवता कुटुंबातील प्रत्येकाचा सहभाग असावा. मुलांना खेळणी खेळून झाल्यानंतर जागेवर ठेवणे, शाळेची बॅग व्यवस्थित ठेवणे आणि अभ्यासाचे टेबल आवरणे शिकवा. सुरुवातीला त्यांना मदत करावी लागू शकते; मात्र हळूहळू या सवयी अंगवळणी पडतील.

रोज काही मिनिटे स्वच्छतेसाठी द्या

संपूर्ण घराची साफसफाई एकाच दिवशी करण्याऐवजी रोज थोडा वेळ त्यासाठी राखून ठेवा. उदाहरणार्थ, एका दिवशी किचन व्यवस्थित करा, तर दुसऱ्या दिवशी कपाट किंवा टेबलावरील धूळ पुसा. रात्री झोपण्यापूर्वी वस्तू जागेवर ठेवणे आणि कचरा काढणे यासाठी काही मिनिटे द्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us