
महाराष्ट्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.

सोलापूर, धाराशिव, अहमदनगर, जालना, बीड आणि करमाळा या भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

सोलापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून, शहराकडे येणारे आणि शहरातून जाणारे रेल्वे आणि रस्ते मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर-मुंबई वंदे भारत आणि हुतात्मा एक्सप्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्या थांबल्या आहेत.

तसेच, सोलापूर-पुणे आणि सोलापूर-कोल्हापूर हे राष्ट्रीय महामार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. माढा आणि मोहोळ तालुक्यांमध्ये अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, एनडीआरएफ आणि आर्मी यांच्या मदतीने बचावकार्य वेगाने सुरू आहे.

माढा तालुक्यातील राहुलनगर, दारफळ आणि वाकाव येथे बचावकार्य सुरू असून, रात्रीच्या वेळी अडकलेल्यांसाठी फूड पॅकेट पोहोचवण्यात आले आहेत. तर परंडा, भूम आणि कळंब तालुक्यांत द्राक्षबागा आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

जळगावातील चाळीसगाव तालुक्यातील जामडी परिसरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. नाल्याला पूल नसल्याने कमरेइतक्या पाण्यातून केळीचे घड वाहून न्यावे लागत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत ६४ हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे.

राज्यातील पूर परिस्थिती पाहता अनेक मंत्री आणि नेते पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. मंत्री पंकजा मुंडे यांनी जालन्यातील गोळेगावला भेट दिली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाल्याची माहिती दिली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांसाठी २,२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.