
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' ही मालिका गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात रमा-अक्षयच्या नात्यात लवकरच नवं वळण येणार आहे. आता रमा-अक्षय नाही तर स्वरा-अक्षय ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर स्वरा ही भूमिका साकारणार असून जवळपास 16 वर्षांनंतर ती स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. स्वरा या पात्राविषयी सांगताना सुरुची म्हणाली, "साधारण 16 वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्या 'ओळख' या मालिकेनं मला अभिनेत्री म्हणून खऱ्या अर्थाने ओळख दिली होती."

"पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या कुटुंबात येताना मला अतिशय आनंद होतोय. खरंतर मला सकारात्मक व्यक्तिरेखा साकारायची होती आणि तेव्हा स्वरा या भूमिकेसाठी विचारणा झाली. स्वरा अतिशय सुंदर, हुशार आणि आत्मविश्वासू मुलगी आहे," असं तिने भूमिकेविषयी सांगितलं.

याविषयी ती पुढे म्हणाली, "प्रचंड हळवी असल्यामुळे तिच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. एकमेकांवर खरं प्रेम करणाऱ्या माणसांनी कधी दूर जाऊ नये असं स्वराचं मत आहे. त्यामुळे रमा-अक्षयच्या नात्यात स्वराच्या येण्याने नेमकं काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे."

'मुरांबा' मालिकेत सात वर्षांचा लीप आल्यानंतर रमा आणि अक्षयचं नातंही नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. सात वर्षांपूर्वी एकमेकांमधल्या गैरसमजांमुळे रमा-अक्षय दुरावले होते. या लीपनंतर मालिकेत रमाचा नवीन लूक पहायला मिळतोय.