
माथेरान... अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटकलेलं थंड हवेचं ठिकाण... पावसाळ्यात तर माथेरानच्या सौंदर्यात आणखी भर पडते. यंदाच्या पावसाळ्यातही माथेरान त्याच्या सौंदर्याने पर्यटकांना प्रेमात पाडतंय.

गडद आकाश, ढगांचा खेळ, विजांचा कडकडाट आणि सूर्यास्ताला विविध रंगामध्ये न्हाऊन निघालेले आकाश पाहणं ही जणू एक पर्वणीच... वळणवळणाचा रस्ता अन् त्यावरून वाट काढणारे प्रवासी... अशी ही माथेरानची मनमोहक दृश्ये...

अगदी आभासी वाटावा असा हा नजारा... सोसाट्याचा वारा सुटत, विजांच्या गडगडाटाने जेव्हा मनाला हुरहूर लागते, त्याच क्षणी अंगावर कोसळणारे पावसाचे थेंब हवेहवेसे वाटतात.

पयर्टकांना आकर्षित करणारा असा माथेरानचा नजारा... पाऊस सुरु झाल्यावर येणारा मातीचा गंध, झाडांवर ओघळणारे पावसांचे थेंब , टपोऱ्या थेंबाचा निनादणारा आवाज.... असं हे पावसाळ्यातील माथेरान...

ऐन पावसाळ्यात एकदा तरी माथेरानला जायलाच हवं... एकदा तरी असा हा निसर्ग सौंदर्याचा अविष्कार अनुभवायला हवा... त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात एक तरी माथेरान ट्रीप करा अन् टॉय ट्रेनवरून चालताना पावसाळा अनुभवा...