‘देऊळ बंद 2’मध्ये स्वामी समर्थांची भूमिका साकारण्यास मोहन जोशी यांनी का दिलेला नकार?
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी 'देऊळ बंद 2' या चित्रपटाला आधी नकार दिला होता. यामधून ते पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेव्हा 'देऊळ बंद 2' या चित्रपटाची घोषणा केली, तेव्हापासूनच त्यात स्वामी समर्थांची भूमिका कोण साकारणार, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होता. 'देऊळ बंद' या पहिल्या भागात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी स्वामींची भूमिका साकारली होती, आणि आता सीक्वेलमध्येही तेच या भूमिकेत आहेत. मात्र सुरुवातीला त्यांनी या भूमिकेला नकार दिला होता.

प्रवीण तरडे यांनी त्यामागचं कारण एका मुलाखतीत सांगितलं होतं. "देऊळ बंद 2 च्या वेळी मोहन जोशी आजारी होते. त्यांनी स्वामींच्या भूमिकेसाठी नकार दिला होता. मी अभिनय बंद केलाय असं समज, असं ते मला म्हणाले होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही सांगा की मी किती वर्षे थांबू? कारण स्वामींच्या भूमिकेत तुमच्याशिवाय लोक आता कुणालाच बघू शकणार नाहीत", असं तरडे म्हणाले.

मला तुम्हीच हवे आहात, असा आग्रह प्रवीण तरडेंनी मोहन जोशींसमोर धरला होता. तेव्हा त्यांनी तरडेंकडे थोडा वेळ मागितला. कारण पॅरालिसिसमुळे त्यांना चालता आणि बोलता येत नव्हतं. ते फक्त दोनच पावलं चालू शकत होते. त्यानंतर दीड वर्ष त्यांनी या भूमिकेसाठी खूप प्रयत्न केले. तोंडात पेन्सिल ठेवून बोलण्याचा सराव केला. ते जेव्हा चालू-बोलू लागले, तेव्हा शूटिंगला सुरुवात करण्यात आली.

2015 मध्ये 'देऊळ बंद' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहुना विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे हे अधोरेखित करणाऱ्या तसंच श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्याभोवती फिरणाऱ्या कथेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. आता दुसऱ्या भागात एका नास्तिक शेतकरी महिलेची कथा दाखवण्यात आली आहे.

'देऊळ बंद 2' हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये दमदार कामगिरी करतोय. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने 20 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. यामध्ये स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.