
महावितणकडूनच 'शॉक' : जिल्ह्यात ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक घटना ह्या महावितरणच्या चूकीमुळेच झालेल्या आहेत. शार्टसर्किट, विद्युत तारांची पडझड यामुळे ऊसाला आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.

वडवणीत 4 एक्कर ऊस जळून खाक : रविवारी पहाटे वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील शेतकरी नवनाथ शेंडगे यांच्या 4 एकरातील फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. यामध्ये त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिक ऊसाचे गाळप करुनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. 12 महिन्यांपेक्षा अधिकचा काळ होऊनही ऊस फडातच असल्याने वजनात घट होत आहे तर वाढत्या उन्हामुळे आता उत्पादनावरही परिणाम होत आहे.

डोळ्यादेखत ऊसाच्या फडाला आग : शेतकरी नवनाथ शेंडगे हे शेतामध्येच असताना रविवारी पहाटे अचानक त्यांच्या 4 एकरातील ऊसाच्या फडाला आग लागली. सर्वकाही डोळ्यादेखत होत असतानाही शेंडगे हे काही करु शकले नाहीत. ऊसाचे पाचट आणि वारे यामुळे अवघ्या काही वेळेत 4 एकरातील ऊस जळून खाक झाला.

मदतीची मागणी : उत्पादनावर लाखोंचा खर्च आणि सर्वात मोठे नगदी पीक म्हणून वर्षभर केलेली जोपासना सर्वकाही व्यर्थ झाले आहे. त्यामुळे किमान झालेला खर्च तरी पदरात पडेल या हिशोबाने सरकारने मदत करावी अशी अपेक्षा शेंडगे यांनी व्यक्त केली आहे.