
नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेले काही कैदी खुलेआम गांजाचे सेवन करत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या कैद्यांनी कारागृहाच्या आत मोबाईल फोन वापरून गांजा ओढताना सेल्फी व्हिडिओ शूट केला आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक मध्यवर्ती कारागृहातील काही कैदी एकत्र येऊन गांजाचे सेवन करत होते. त्यांनी मातीची चिलिम वापरून हे अमली पदार्थ ओढले. इतकेच नव्हे, तर त्यांनी ही गांजा पार्टी मोबाईल फोनमध्ये चित्रित केली आणि त्याचे फोटोसेशन केले.

यामुळे कैद्यांकडून कारागृहातील नियमांचे सर्रास उल्लंघन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे व्हिडीओ बनवून ते व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या व्हायरल व्हिडीओ आणि फोटोमध्ये दिसणारे कैदी मकोका (MCOCA) आणि खून (Murder) यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत आहेत. या गंभीर गुन्हेगारांकडून कारागृहात नियमांचे उल्लंघन होत असल्याने, कारागृहात सामान्य कैदी किती सुरक्षित असतील, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

या घटनेमुळे कारागृह प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारागृहात मोबाईल वापरण्यास सक्त मनाई असताना, कैद्यांपर्यंत मोबाईल फोन कसा पोहोचला? गांजा किंवा इतर अमली पदार्थ आणि ते सेवन करण्याचे साहित्य (चिलिम) कारागृहाच्या आतपर्यंत कसे आले? यामागे कारागृहातील कर्मचाऱ्यांची मदत आहे का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

याप्रकरणी कारागृह प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून कैद्यांना मदत मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही धक्कादायक बाब समोर येताच कारागृह प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओच्या आधारावर दोषी कैद्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. तसेच, या गैरप्रकाराला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.

यापूर्वीही २०१६ मध्ये नाशिक कारागृहात कैद्यांकडे मोबाईल आढळल्याची घटना घडली होती. त्यावेळी तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र, त्या घटनेतूनही प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याचे या ताज्या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान कारागृहातील या गैरप्रकारांवर वेळीच अंकुश न घातल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ज्यामुळे केवळ कारागृहातील कायदा व सुव्यवस्थाच धोक्यात येणार नाही, तर गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन मिळून प्रशासनाची प्रतिमा मलिन होईल.