Neena Kulkarni: नाटक पाहताच प्रेमात पडल्या, पण लग्नाला घरच्यांचा होता विरोध; नीना कुळकर्णींची हटके लव्हस्टोरी
Neena Kulkarni: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची लव्हस्टोरी तुम्हाला माहीत आहे का? नाटक पाहताच त्या दिलीप कुळकर्णी यांच्या प्रेमात पडल्या होत्या. मात्र त्यांच्या लग्नाला घरातून विरोध होता.

Neena Kulkarni: मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी आपल्या अभिनयाने अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही अनेकदा चर्चेत असतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पती आणि अभिनेते दिलीप कुळकर्णी यांच्यासोबतची प्रेमकहाणी सांगितली.
विशेष म्हणजे, दिलीप यांचं नाटक पाहिल्यानंतरच नीना त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. मात्र, त्यांच्या लग्नाला घरातून विरोध होता. या आठवणी सांगताना त्यांनी आपल्या आडनावामागची एक खास गोष्टही उलगडली आहे. नीना कुळकर्णी यांनी हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत आपल्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं. त्यांची आणि दिलीप कुळकर्णी यांची ओळख दुबे यांच्या नाट्यगटातून झाली होती.
मात्र, त्याआधीच नीना यांनी दिलीप यांनी दिग्दर्शित केलेलं एक नाटक पाहिलं होतं. हे नाटक पाहून त्या इतक्या प्रभावित झाल्या की, नाटकाच्या दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्याचं त्यांनी त्यावेळी आपल्या शेजारी बसलेल्या लोकांनाही सांगितलं होतं. विशेष म्हणजे, तेव्हा दिलीप कोण आहेत, त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसतानाही त्यांचं काम पाहून नीना त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या.
दिलीप हे स्वभावाने अतिशय शांत आणि मितभाषी होते. ते फार कमी लोकांशी बोलायचे. त्यांची हीच गोष्ट नीना यांना आवडली होती. दिलीप आवडत असल्याचं त्यांनी जेव्हा आपल्या बहिणीला सांगितलं, तेव्हा तीही आश्चर्यचकित झाली होती. नीना आणि दिलीप यांचं प्रेमविवाह होता. मात्र, त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. यामागचं कारण प्रेमविवाह नव्हतं, तर दिलीप यांचं नाटक आणि थिएटरमधील काम होतं.
नीना यांनी सांगितलं की, नाटकात काम करणाऱ्या मुलाशी लग्न केल्यानंतर भविष्यात आर्थिक स्थैर्य कसं असेल, असा प्रश्न त्यांच्या घरच्यांना पडला होता. दिलीप यांची परिस्थितीही फार वेगळी नव्हती. त्यांची आई लवकर गेल्यानंतर ते देवळालीहून मुंबईत आले होते. मुंबईत ते बँकेत नोकरी करत आणि वेळ मिळेल तसा नाटकांमध्ये काम करत. ज्येष्ठ नाटककार दुबे यांच्या नाट्यगटात ते महत्त्वाची भूमिका बजावत होते.
नीना यांनी त्यांच्या आडनावामागची एक गमतीशीर आठवणही सांगितली. 'आपलं बुवा असं आहे' या नाटकाच्या प्रयोगादरम्यान दिलीप प्रेक्षकांशी संवाद साधायचे. त्यावेळी ते स्वतःची ओळख करून देताना 'नमस्कार, मी दिलीप कुळकर्णी, ळ बरं का!' असं म्हणायचे. त्यांची ही ओळ नीना यांच्या कायम लक्षात राहिली. नीना आणि दिलीप यांनी 1980 मध्ये लग्न केलं होतं. मात्र, 2002 मध्ये दिलीप कुळकर्णी यांचं निधन झालं. त्यानंतर नीना यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ करत अभिनय क्षेत्रातील काम सुरू ठेवलं.