
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेनं अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यात अभिनेत्री निधी भानुशालीचाही समावेश आहे. निधीने या मालिकेत 'गोकुलधाम' सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी भिडे मास्तर यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.

मालिकेत जवळपास सात वर्षांपर्यंत तिने सोनूची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने मालिकेला रामराम केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आता निधीने त्यामागील खरं कारण सांगितलं आहे.

निधीने सांगितलं की कामाच्या ताणामुळे सेटवर अनेकदा तिचं इमोशनल ब्रेकडाऊन (भावनिकदृष्ट्या खचणं) व्हायचं. याच कारणामुळे तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता.

'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत निधी म्हणाली, "मी तेव्हा सात वर्षांपर्यंत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करत होती, तेव्हा मी भावनिकदृष्ट्या पूर्णपणे खचले होते. सुरुवातीला मी बरंच एंजॉय करत होते, कारण मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या."

"जेव्हा तेच काम माझं रुटीन बनलं, तेव्हा मला समजत नव्हतं की याचा माझ्या डोक्यावर खूप ताण होतोय. जेव्हा तुम्ही सतत पळत असता, तेव्हा तुम्हाला वाटतं की थांबायची काही गरज नाही. जेव्हा डोक्यावरून पाणी गेलं, तेव्हा मी अभिनय सोडून ब्रेक घेतला", असं तिने स्पष्ट केलं.