
स्वयंपाकघरात तेल आणि मसाल्यांचा सातत्याने वापर होत असल्यामुळे भांडी आणि कंटेनर लवकर चिकट आणि अस्वच्छ होतात. हे डाग वेळेत काढले नाहीत तर ते तसेच राहतात आणि साफसफाईसाठी खूप वेळ लागतो. स्वयंपाकघरातील या भांड्यांची स्वच्छता अधिक सोपी करण्यासाठी तसेच यातील तेलकटपणा आणि घाण सहजपणे काढण्यासाठी खालील पद्धत फारच उपयुक्त पडू शकतात.

बेकिंग सोडा हा चिकटपणा आणि वास काढण्यासाठी उत्कृष्ट मानला जातो. एका मोठ्या भांड्यात किंवा बादलीत कोमट पाणी घ्या. त्यात सुमारे दोन ते तीन चमचे बेकिंग सोडा आणि थोडी डिटर्जंट पावडर मिसळा. तुमचे सर्व घाणेरडे, तेलकट डब्बे आणि कंटेनर या द्रावणात पूर्णपणे बुडवून काही तास किंवा रात्रभर भिजवा.

ते भिजवल्यानंतर कंटेनर बाहेर काढा. आता स्क्रबर वापरून हलक्या हाताने घासून स्वच्छ करा. बहुतांश चिकटपणा आणि डाग सहजपणे निघून जातील. त्यामुळे डब्यांचा रंग पुन्हा स्वच्छ होईल. यानंतर ओल्या कापडाने पूर्णपणे पुसून किंवा धुऊन वाळवा.

बेकिंग सोडा उपलब्ध नसल्यास, लिंबू आणि गरम पाणी हा नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. यासाठी एका बादलीत किंवा मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या. त्यात सुमारे दोन ते तीन लिंबांचा रस आणि थोडा साबण घाला. यानंतर घाणेरडे कंटेनर या द्रवात पूर्णपणे बुडवा आणि काही वेळ तसेच ठेवा. लिंबाच्या रसातील आम्ल (ऍसिड) असते. त्यामुळे चिकटपणा नाहीसा होतो. काही वेळाने कंटेनर बाहेर काढून नेहमीच्या पद्धतीने स्क्रबरने घासून स्वच्छ करा.

व्हिनेगर विशेषतः प्लास्टिकच्या कंटेनरवरील वास आणि चिकटपणा काढण्यासाठी प्रभावी आहे. एका भांड्यात कोमट पाणी आणि व्हिनेगर समान प्रमाणात किंवा गरजेनुसार एकत्र करा. हे व्हिनेगरचे द्रावण एका स्वच्छ कापडाच्या मदतीने सर्व कंटेनरच्या पृष्ठभागावर व्यवस्थित लावा. यानंतर स्क्रबरवर थोडे सौम्य डिटर्जंट लावा. त्यानंतर कंटेनर घासून स्वच्छ करा. व्हिनेगरमुळे भांड्यांवरील चिकटपणा कमी होण्यास मदत होईल.

यातील कोणताही उपाय केल्यास तुम्हाला डब्बे तासनतास घासावे लागणार नाही. त्यामुळे तुमच्या कष्टाचे काम कमी होईल. चिकटपणा आपोआप सैल झाल्यामुळे साफसफाई जलद आणि सोपी होईल.