
भारतीय लष्करी अधिकाऱ्याला किस करणाऱ्या तुर्की महिलेच्या फोटोने सर्वांची मने जिंकली आहेत. हे चित्र त्या देशाच्या लष्कराचे आहे जे कोणताही भेदभाव न करता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मदतीसाठी पोहोचू शकते. हे चित्र आपल्या लष्कराचं आहे. तुर्कस्तानला सोमवारी भीषण भूकंपाचा धक्का बसला तेव्हा भारताने सर्वप्रथम मदतीचा हात पुढे केला. दुर्घटनेला सामोरे जाणाऱ्या तुर्कस्तानला भारत 'ऑपरेशन दोस्त'च्या माध्यमातून मदत करत आहे.

भारताच्या वतीने NDRF आणि लष्कराची पथके तुर्कस्तानच्या गझियांटेप प्रांतात पाठवण्यात आली होती. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही काही छायाचित्रे ट्विट केली आहेत. गुरुवारी भारतीय हवाई दलाने बचाव कार्य व्यतिरिक्त जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय उपकरणे तुर्कस्तानला पाठवली आहेत. सहाव्या विमानात रेस्क्यू टीम व्यतिरिक्त श्वान पथक आणि आवश्यक औषधे पाठविण्यात आली आहेत.

तुर्कस्तानच्या हाते प्रांतातील इस्कंदरुन येथे एक फिल्ड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. भूकंपामुळे बाधित झालेल्यांवर उपचार केले जाणार आहेत. मेडिकल आणि क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट येथे तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन स्थितीत आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठीही हे पथक सज्ज होत आहे.

सी-१७ ग्लोबमास्टर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने हवाई दलाने एनडीआरएफ आणि लष्कराच्या डॉक्टरांची पथके पाठवली होती. यानंतर तुर्कीचे राजदूत फिरात सुनेल यांनी भारताला मित्र म्हटले होते. ते म्हणाले की, ऑपरेशन दोस्त ही एक मोहीम आहे जी भारत-तुर्की संबंध मजबूत करेल. सुनेल यांच्या मते ऑपरेशन दोस्त ही महत्त्वाची मोहीम आहे. गरजेच्या वेळी दोन्ही मित्र एकमेकांना कशी मदत करतात हे या मिशनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कस्तानमध्ये 17,674 तर सीरियात 3377 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढू शकतो, असे मानले जात आहे. कारण आता ढिगाऱ्यात कोणी जिवंत राहण्याची आशाही कमी झाली आहे.