
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत होणारे एसटीचे अपघात हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे आज मुंबईतील परळ बसस्थानकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली. त्यांनी अचानक भेट दिल्यामुळे बस डेपोमध्ये ज्या गोष्टी सापडल्या त्या पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

आज मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या, तसेच काही कर्मचाऱ्यांकडून मद्यपान केल्याची दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या मंत्री सरनाईक यांनी तेथे उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

“परगावी कर्तव्य बजावणाऱ्या चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र, अशा ठिकाणी मद्यपानासारखे निंदनीय कृत्य घडत असेल, तर ते केवळ शिस्तभंग नाही तर प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ करणारे अत्यंत धोकादायक कृत्य आहे” असे प्रताप सरनाईक म्हणाले.

कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. तसेच आज आढळून आलेल्या गैरप्रकारांबाबत स्वतंत्र विभागीय चौकशी समिती नेमून, अहवालाच्या आधारे दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

या दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील स्वच्छता, प्रसाधनगृहे आणि बसेसच्या नियोजनाचीही पाहणी केली. प्रवाशांच्या सुरक्षितता व सुखसुविधांबाबत अधिक दक्ष राहण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.