
रेल्वे बोर्डाने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (IRCTC) तिकीट बुकिंग दरम्यान जेवणाचा पर्याय न निवडणाऱ्या प्रवाशांना जेवणाची सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. बुकिंगच्या वेळी जेवणाच्या पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांप्रमाणे न निवडणाऱ्या प्रवाशांना तयार जेवण (Ready to Eat - RTE) दिले जावे.

वंदे भारतमधील प्रवाशांची एक सामान्य तक्रार होती की, तिकीट बुकिंग दरम्यान जेवणाची निवड केली नसेल तरी प्रवास करताना त्याची पूर्ण किंमत देण्यास तयार असल्यावरही आयआरसीटीसीचे कर्मचारी जेवण देण्यास नकार देतात.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेकदा प्रवासी तिकीट बुकिंग दरम्यान जेवणाची निवड करत नाहीत. परंतु प्रवासादरम्यान त्यांना त्याची गरज लागते. या परिस्थितीत निवड न केलेल्या प्रवाशांनाही वंदे भारत गाड्यांमध्ये स्वच्छ आणि दर्जेदार जेवण दिले जाणार आहे.

रेल्वेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा अशा प्रवाशांना होणार आहे, जे शेवटच्या क्षणी तिकीट काढतात. परंतु जेवणाची निवड करत नाही. त्यांना प्रवासादरम्यान जेवणाची गरज वाटते. आता रेल्वेच्या निर्णयामुळे वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी प्रवासादरम्यानही त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ आरामात खरेदी करू शकतात.

रेल्वे बोर्डाने IRCTC ला प्रवाशांना चांगल्या दर्जाचे आणि आरोग्यदायी जेवण दिले जाईल, याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेतील खाद्यपदार्थांची विक्री निर्धारित वेळेतच ट्रॉलीद्वारे केली जाईल, असेही बोर्डाने म्हटले आहे.