
मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन यांच्या संकल्पनेतून नारी सशक्तिकरण फाऊंडेशनच्या माध्यमातून नारी शक्ती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील मॅक्सस मॉल मैदान, शिवार गार्डन आणि जेसल पार्क इथं नारी शक्ती प्रदर्शन आणि विक्री केंद्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला शहरातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं.

दिवाळीचा फराळ, सजावटीच्या वस्तू, शोभेच्या वस्तू आणि अन्य दैनंदिन जीवनातील उपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील गरजू आणि होतकरु महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचा मानस नारी सशक्तिकरण फाऊंडेशनचा होता.

आमदार गीता जैन यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रदर्शनात कपडे, दिवाळीचा फराळ, मसाल्याचे पदार्थ, हाताने बनवलेल्या शोभेच्या विविध वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. शहरातील नागरिकांनीही या उपक्रमाला भेट देत अनेक संसारोपयोगी वस्तू आणि साहित्याची खरेदी केली.

प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी गीता जैन यांच्या हस्ते उपक्रमात सहभागी झालेल्या स्टॉल धारकांना प्रमाणपत्र, तुळशी वृंदावन भेट स्वरुपात देण्यात आले. कोरोना काळात रोजगार गमावलेल्या महिलांसाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरेल असा विश्वास गीता जैन यांनी यावेळी व्यक्त केला.