वंचित-काँग्रेस यांच्यात ऐतिहासिक युती, मुंबई पालिका निवडणुकीचं गणित बदलणार; नेमकं काय होणार?
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सध्या राज्याच्या केंद्रस्थानी आली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली आहे.या युतीची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.

Congress And VBA Alliance : येत्या 15 जानेवारी रोजी राज्यातील एकूण 29 महानगरपलािकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल लगेच 16 जानेवारी रोजी लागेल. एकाच दिवशी 29 महापालिकांसाठी निवडणूक होत असली तरी या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचीच सगळीकडे चर्चा आहे. भाजपा, शिवसेनेचा ठाकरे गट तसेच शिवसेनेचा शिंदे गट यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. ठाकरे गटाने यावेळी मनसेसोबत युती केली आहे. या युतीसोबत आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असेल. तर दुसरीकडे शिंदे गट आणि भाजपा एकत्र येऊन ठाकरे यांना रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, का मुंबईत राजकीय घडामोडी वाढलेल्या असतानाच आता काँग्रेसने मोठी चाल खेळली आहे. काँग्रेसने दलित तसेच बहुजन मतदार पाठिशी असलेल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाशी युती केली आहे. या युतीमुळे आता मुंबईतील राजकीय गणित बदलणार आहे.
वंचित -काँग्रेसमध्ये नेमकं काय ठरलं?
प्रकाश आंबेडकर सर्वेसर्वा असलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीची आज अधिकृतपणे घोषणा झाली. मुंबईतील टिळक भवनात पत्रकार परिषद घेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यावेळी उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 जागांपैकी वंचित बहुजन आघाडीला 62 जागा आणि काँग्रेस एकूण 165 जागा लढवणार आहे.
मुंबईचं राजकारण कसं बदलणार?
मुूंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपा एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी विकास आणि हिंदुत्त्व हे दोन मुद्दे केंद्रस्थानी ठेवले आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ठाकरे गट-मनसे युती मराठीच्या मुद्द्यावरून निवडणूक लवढवार आहे. अशा स्थितीत आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याने मुंबईत तिसरा शक्तीशाली पर्याय उभा राहिला आहे. या आघाडीमध्ये काँग्रेसकडून सर्वधर्मसमभाव, संविधान सन्मान हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले जातील तर वंचित बहुजन आघाडी आरक्षण, संविधान बचाव या मुद्द्यांना घेऊन दलित, मुस्लीम, बहुजन मतदारांना आकर्षित करणार आहे.
दलित, बहुजन मतदार कोणाकडे वळणार?
मुंबईतील दलित, बहुजन मतदार विखुरलेला आहे. परंतु यातील बराच मतदार हा प्रकाश आंबेडकरांना मानणारा आहे. असे असताना वंचितची काँग्रेसोबत युती झाल्याने हा मतदार आता काँग्रेसकडे वळण्याची दाट शक्यता आहे. त्याचा फटका हा महायुतीला बसू शकतो. सोबतच ठाकरे यांना मत देणारा दलित, बहुजन मतदार हा पुन्हा वंचित आणि काँग्रेसकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वंचित-काँग्रेसची युती ठरणार नवा पर्याय
काँग्रेस आणि वंचितची आघाडी ही अनेक अर्थांनी विशेष आहे. 2017 सालच्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँगेसला एकूण 16 टक्के मतं मिळाली होती. आता काँग्रेसची आघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्षांना मिळणारी मतांची टक्केवारी 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. दुसरीकडे महायुतीला 55 ते 60 टक्के मते मिळाली होती. यामध्ये भाजपाला मिळालेल्या मतांचे प्रमाण हे 27 टक्के तर शिवसेनेला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही 28 टक्के होती. त्यामुळेच काँग्रेस आणि वंचित यांना 25 टक्क्यांपर्यंत मतं मिळाली तर सत्तास्थापनेमध्ये या आघाडीची मोठी भूमिका असू शकते. दरम्यान, काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाल्यामुळे ही निवडणूक तिहेरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
