
बार्बाडोसमध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी सकाळी भारतात दाखल झाला. भारतात येताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदींच्या निवासस्थानी ही भेट आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मोदी आणि टीम इंडियाच्या खेळांडूंमध्ये जवळपास दीड तास चर्चा रंगली होती. त्यानंतर संपूर्ण टीमसोबत त्यांनी फोटो काढला. या फोटोमध्ये एका बाजूला टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड आणि दुसऱ्या बाजूला रोहित शर्माने वर्ल्ड कप हाती घेतल्याचं पहायला मिळतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रॉफीला स्पर्श केला नाही. फोटोमध्ये ते राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांचा हात धरल्याचं पहायला मिळतंय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून अनेकजण मोदींचं कौतुकदेखील करत आहेत.

एखादा संघ किंवा व्यक्तीने जिंकलेल्या ट्रॉफी/पदकाला केवळ संघ किंवा खेळाडूंनीच स्पर्श केला पाहिजे, असा अलिखित नियम आहे. म्हणूनच मोदींच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंसोबत गप्पा मारल्या. टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड यांनीसुद्धा आपला अनुभव सांगितला. वर्ल्ड कपच्या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विजयी झाल्यानंतर मैदानावरच त्याला अश्रू अनावर झाले होते. मोदींसमोर त्याने या विजयाचा अनुभव सांगितला.