
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये राज्यभरातून कार्यकर्ते दाखल होत असतात. त्यामुळे गोविंदबाग या पवारांच्या निवासस्थानी दिवाळीच्या निमित्ताने अधिकच गर्दी पाहायला मिळते.

शरद पवार यांच्या भेटीसाठी 'उप महाराष्ट्र केसरी' ठरलेले पैलवान तुषार वरखडे बारामतीत आले होते. दिवाळीनिमित्त तुषार वरखडे पवारांना चांदीची गदा भेट देणार आहेत.

तब्बल सव्वा चार किलो वजनाची चांदीची गदा पवारांना भेट दिली जाणार आहे. भोर मैदानात मिळालेली चांदीची गदा भेट म्हणून देण्याचा पैलवान वरखडे यांचा निर्धार आहे.

दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने 'तेल लावलेले पैलवान' या मुद्द्यावरुन टीकांचा धुरळा उठला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वरचढ ठरले होते.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय असणारे पवार कुटुंबीय दिवाळीच्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये एकत्र जमले आहेत. काल लक्ष्मीपूजनानंतर पवार कुटुंबीयांची मेजवानी पार पडली. यावेळी गोविंदबागेतील हिरवळीवर एकत्रित येत पवार कुटुंबाने खास फोटोसेशन केले.