
गुंतवणुकीविषयी लोक सजग आहेत. कोणी शेअर बाजारात पैसा गुंतवतो तर एखादा म्युच्युअल फंड्स वा सरकारी योजना निवडतो. तर काही लोक पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात.

जर तुम्ही दरमहा कमाई करु इच्छित असाल आणि तुमचे पैसे सुद्धा सुरक्षित राहावेत असे तुम्हाला वाटत असेल तर टपाल खात्याची मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. ही योजना निश्चित परतावा आणि हमीपात्र कमाई करुन देते.

ज्या लोकांना मासिक एक निश्चित उत्पन्न हवे आहे, त्या लोकांसाठी ही योजना चांगली आहे. या योजनेत तुम्ही एकदा गुंतवणूक केली तर नंतर दरमहा एक निश्चित व्याज तुमच्याकडे जमा होते. पोस्टाच्या गुंतवणूक योजना या सुरक्षित आहेत. कारण त्यांना सरकारचे संरक्षण आहे.

या योजनेत गुंतवणूकदारांना त्यांच्या जमा रक्कमेवर दरमहा एक व्याज मिळते. तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. सोबत दरमहा उत्पन्न पण मिळते. यामुळे ही योजना नोकरी करणारे, सेवा निवृत्तीधारकांसाठी सर्वात चांगला पर्याय आहे.

जर तुम्हाला दरमहा या योजनेतून 6000 रुपये कमाई हवी असेल तर त्यासाठी या योजनेत तुम्हाला 9.7 लाखांच्या जवळपास गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये वार्षिक 7.4 टक्के व्याज मिळेल. त्याआधारे या योजनेत या रक्कमेवर गुंतवणूकदाराला 72 हजार रुपये व्याज मिळेल.

म्हणजे एकदा मोठी रक्कम गुंतवून दरमहा 6000 रुपये मिळण्याची सोय होईल. ही रक्कम तुम्ही पुन्हा आवर्ती ठेव योजनेत गुंतवली तर पैशावर पैसा उभारता येईल. पतसंस्थांमध्ये मोठी रक्कम गुंतवून फसवणूक होण्यापेक्षा पोस्टाच्या योजना सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरतात.