इंद्रायणी नदीत जिकडे-तिकडे मृत माशांचा खच, नेमका कोणाचा शाप लागला? भाविकांमध्ये संताप!
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून केमिकल आणि रसायनमिश्रित सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत मिसळत असल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे नदीतील जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे- तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने भाविक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय.
आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पाणी साठवण बंधाऱ्यापासून चिंबळी बंधाऱ्यापर्यंत नदीपात्रात हजारो मृत माशांचा खच आढळून आला आहे. मृत माशांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो आता समोर आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून केमिकल आणि रसायनमिश्रित सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत मिसळत असल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे नदीतील जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पवित्र इंद्रायणीची ही अवस्था पाहून भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रदूषणाला जबाबदार कोण? आणि नदीच्या प्रदूषणावर प्रशासन कधी ठोस कारवाई करणार? असा सवाल उपस्थित केला जातोय.
नदी प्रदूषणामुळे नदी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळायला हवेत. तसेच नियमांचे पालन केले जाते की नाही यावरही सरकारने देखरेख ठेवावी, अशी मागणी आता पुढे केली जात आहे.