
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या बिग बजेट चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या तर अभिनेत्री साई पल्लवी ही सीतेच्या वेशभूषेत पहायला मिळत आहेत.

'रामायण' या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर आणि साई पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारण्यासाठी रणबीर खूप मेहनत घेत आहे. यासाठी तो शाकाहारी जेवण जेवतोय आणि दररोजचा त्याचा वर्कआऊट रुटीनसुद्धा बदलला आहे.

‘रामायण’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाल्याचं कळतंय. चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीही 'रामायण'च्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. या फोटोंमध्ये अरुण गोविल हे दशरथ यांच्या भूमिकेत तर अभिनेत्री लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात बॉबी देओल, विजय सेतुपती आणि सनी देओल यांच्याही भूमिका असल्याचं कळतंय.

यामध्ये रावणाची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. ‘केजीएफ’ स्टार यशला रावणाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र त्याने या भूमिकेला नकार दिल्याचं कळतंय. नितेश तिवारी यांचा हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील हा बिग बजेट चित्रपट असेल.