Riteish Deshmukh: तिन्ही सुनांचा सासूबाईंसोबत खास सेल्फी, नातवंडांसोबत आजीची आरती; रितेश-जिनिलियाची गावाकडची दिवाळी
Riteish Deshmukh: रितेश देशमुख आणि त्याचं संपूर्ण कुटुंब बाभळगावात दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचलं आहे. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत रितेशने काही खास फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.

दिवाळी म्हटलं की रोषणाई, फराळ आणि कुटुंबीयांसोबतचा आनंद! अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्यासाठी यंदाची दिवाळी काहीशी खास ठरली आहे. ग्लॅमरच्या दुनियेत वावरणारं हे लोकप्रिय जोडपं दिवाळीनिमित्त मुंबईतील धावपळ बाजूला ठेवून आपल्या मूळ गावी म्हणजेच लातूरमधील बाभळगाव इथं पोहोचलं. विशेष म्हणजे, यावेळी रितेश आणि जिनिलिया यांच्यासह संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र आलं होतं.
या खास सेलिब्रेशनचे फोटो रितेशने सोशल मीडियावर शेअर केले असून त्यावर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रितेश देशमुख, जिनिलिया, त्यांची दोन्ही मुलं रियान आणि राहिल, तसंच रितेशचे भाऊ अमित देशमुख आणि धीरज देशमुख त्यांच्या कुटुंबीयांसह दिवाळीसाठी बाभळगाव इथल्या घरी एकत्र आले. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन आणि आरती केली.
या दिवाळी सेलिब्रेशनमधील सर्वाधिक लक्षवेधी फोटो म्हणजे देशमुख कुटुंबातील तिन्ही सुनांचा सासूबाई वैशालीताई यांच्यासोबतचा खास सेल्फी. रितेशची पत्नी जिनिलिया, अमित देशमुख यांच्या पत्नी आणि धीरज देशमुख यांच्या पत्नी दीपशिखा यांनी एकत्र फोटो काढत दिवाळीचा आनंद साजरा केला. या फोटोमधील त्यांच्यातील जिव्हाळा आणि आनंद चाहत्यांना भावला आहे.
रितेशने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून कुटुंबीयांसोबतच्या दिवाळीचे सुंदर क्षण चाहत्यांना दाखवले. भावांसोबतचे सेल्फी, मुलांसोबतचे क्षण आणि संपूर्ण कुटुंबाचे फोटो यामधून बाभळगावमधील दिवाळीची झलक पाहायला मिळते. अमित देशमुख यांनीही लक्ष्मीपूजनाचे फोटो शेअर करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.
जिनिलियाने यापूर्वी एका मुलाखतीत देशमुख कुटुंबाच्या दिवाळीच्या परंपरेबद्दल सांगितलं होतं. दरवर्षी संपूर्ण कुटुंब ट्रेनने लातूरला जातं. तिथे एकत्र राहून सण साजरा करण्याची परंपरा आहे. मुलांना शहरासोबतच गावाकडच्या वातावरणाचा अनुभव मिळावा, यासाठीही ती आणि रितेश प्रयत्न करतात. त्यामुळे बाभळगावमधील ही दिवाळी केवळ सण नसून कुटुंबाला एकत्र आणणारा खास सोहळा ठरतो.