‘ते फक्त काम सांगतात, पण मला..’, ‘सैराट’ चित्रपटात कशी मिळाली संधी, अनेक वर्षानंतर सल्याने सांगूनच टाकलं
'सैराट' चित्रपटामध्ये अभिनयाची संधी मिळवण्यासाठी दोन महिने नागराज मंजुळे यांच्या मागे फिरलो, त्यांची सर्व काम केली. सैराट फेम अभिनेत्याचा खुलासा.

मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या 'सैराट' या चित्रपटातून 'सल्या'ची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज खान याने नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याबद्दल अनेक खास आठवणी सांगितल्या आहेत. 'सैराट'मध्ये त्याला संधी कशी मिळाली आणि त्यानंतरही नागराज यांनी आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी कशी साथ दिली याचा खुलासा त्याने केला आहे.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला की, नागराज मंजुळे यांचे घर त्यांच्या घराशेजारीच असल्यामुळे लहानपणापासून त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यांच्या कविता, चित्रकला आणि कामाचा स्वतःवर मोठा प्रभाव पडल्याचेही त्याने सांगितले. 'पिस्तुल्या' आणि 'फँड्री' पाहिल्यानंतर त्याला देखील अभिनय क्षेत्रात काम करायचे असल्याची इच्छा त्याने मनात बळावली होती.

अरबाजने सांगितले की, 'फँड्री'नंतर तो जवळपास दोन महिने नागराज मंजुळे यांच्या मागे अभिनयाची संधी मिळावी म्हणून फिरत होता. मात्र त्यावेळी नागराज त्याला आधी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला देत असत. लहान असल्यामुळे अनेकदा ते त्याच्याकडून दुकानातील कामे करून घेत असत.

तरीही अभिनयाची जिद्द कायम ठेवत त्याने नागराज यांचे भाऊ भूषण मंजुळे यांना मोबाईलवरून अनेक ऑडिशन पाठवले. दोन वेळा ऑडिशन घेतल्यानंतर ती नागराज यांच्याकडे पाठवण्यात आली आणि अखेर त्याला पुण्याला बोलावण्यात आले.

विशेष म्हणजे, 'सैराट'च्या चित्रीकरणाची तयारी सुरू असतानाही आपण चित्रपटात निवड झालो आहोत, हे शेवटच्या काही दिवसांपर्यंत सांगण्यात आले नव्हते. 5 फेब्रुवारीपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते आणि 1 फेब्रुवारीला नागराज मंजुळे यांनी त्याला चित्रपटात भूमिका मिळाल्याची अधिकृत माहिती दिली. तोपर्यंत फक्त सराव सुरू असल्याचेच त्याला वाटत होते.