
अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी नुकताच साखरपुडा केला. या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साखरपुड्यानंतर समाधान सरवणकर यांनी सोशल मीडियावर पहिली पोस्ट लिहिली आहे.

साखरपुड्याचे खास फोटो पोस्ट करत समाधान यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 'एक नवीन सुरुवात, एक नवं आयुष्य देणारा हा क्षण. भावनांच्या ओघात गुंफलेला हा सुंदर प्रवास,' असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय.

'जेव्हा 'मी' आणि 'तू' म्हणत चाललो होतो, आज 'आपण' झालो आणि कायमचे एक झालो. हा क्षण म्हणजे आयुष्यभर जपल्या जाणाऱ्या प्रेमाची सुरूवात,' असल्याचं समाधान सरवणकरांनी म्हटलंय. त्यांच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत. मुंबईतील अत्यंत आलिशान हॉटेलमध्ये तेजस्विनी आणि समाधान यांचा साखरपुडा पार पडला. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी या साखरपुड्याला उपस्थित होते.

तेजस्विनीने मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याचसोबत ती 'बिग बॉस मराठी'मध्येही झळकली होती. 'तुझेच मी गीत गात आहे', 'देवमाणूस' अशा मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.