
नंदुरबारच्या सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमधील घोडेबाजारात एका घोड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गुजरातच्या नागेश देसाई यांच्या स्टडफॉर्मवरील 'ब्रम्होस' नावाचा हा घोडा आहे. तब्बल १५ कोटी रुपये किंमतीचा असल्याची चर्चा आहे.

हा घोडा बाजारातील मुख्य आकर्षण ठरला आहे. ब्रम्होस हा घोडा काळा, रुबाबदार, आणि लयबद्ध चालणारा मारवाडी जातीचा आहे. हा घोडा ३६ महिन्यांचा आहे. त्याची उंची तब्बल ६३ इंच आहे.

तो सध्या देशातील टॉप अश्वांपैकी एक मानला जातो. कपाळावर असलेला आकर्षक पांढरा पट्टा आणि मारवाडी जातीची उठावदार ठेवण हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. पुष्कर बाजारात ब्रम्होसला ८ कोटी रुपयांपर्यंत बोली लागली होती. मात्र, १५ कोटी किंमत असूनही देसाई कुटुंब ब्रम्होसला विकण्यास तयार नाही.

एखाद्या महागड्या लक्झरी कारपेक्षाही महाग असलेल्या या घोड्याची देखरेखही खास आहे. ब्रम्होसच्या खानपानाची आणि देखभालीची विशेष काळजी घेतली जाते. त्याला दिवसभरात तब्बल १५ लीटर दूध आणि अश्वतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पौष्टिक खाद्य त्याला दिले जाते.

तसेच त्याच्या देखभालीसाठी दिवसभर स्वतंत्र मजूर, तसेच मसाज आणि ग्रुमिंगची विशेष व्यवस्था असते. या विशेष देखभालीमुळेच ब्रम्होस देशभरातील अनेक अश्व स्पर्धांमध्ये नंबर वन ठरला आहे. देसाई स्टडफॉर्मवर ब्रम्होसच्या ब्रीडिंगमधून आतापर्यंत १० पिलांना जन्म दिला आहे.

त्यांना बाजारात लाखो रुपयांची बोली लागली आहे. त्यामुळे देसाई कुटुंबाने ब्रम्होसची विक्री न करता, भविष्यात त्याचा उपयोग केवळ हॉर्स ब्रीडिंगसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मते, ब्रम्होस हा केवळ घोडा नसून एक अनमोल संपत्ती आहे. चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपाल रावल यांनीही ब्रम्होसचे कौतुक केले आहे. तो खऱ्या अर्थाने बाजाराचा शोस्टॉपर ठरल्याचे मत व्यक्त केले.